श्रीरामपूरमध्ये 25 लाखांचा शौचालय घोटाळा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शौचालयासाठी एकूण 423 लाभार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे अनुदानापोटी 25 लाख 78 हजार रुपये मिळाले. मात्र सदर अनुदानातून शौचालयाचे बांधकाम न करता ही रक्कम हडप करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नगरपालिकेच्या फिर्यादीवरून 423 लाभार्थ्यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मालन पोपट गाढे व इतर 422 जणांचा समावेश आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबीयांनी शौचालय बांधावे, यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात होते. श्रीरामपुर शहरातील 3 हजार 314 लाभार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले. सदर अनुदानाचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला. मात्र त्यातील 423 लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू न करता सदर रक्कम परस्पर हडप केली. शासनाच्या तब्बल 25 लाख 38 हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केला.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या अधिकारी शालन प्रकाश खलिपे यांच्या फिर्यादीवरून सदर लाभार्थ्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे करीत आहेत.

सर्जेपुरात गीझरचा स्फोट, ३ जखमी