Coronavirus Impact : ‘कोरोना’नं ऑलिम्पिकवर लागवला ‘ब्रेक’, एक वर्षानंतर होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन एक वर्षासाठी तहकूब करण्यात आले आहे. कोविड – 19 च्या धोक्यामुळे आधीच ऑलिम्पिकचे भविष्य धोक्यात आले होते. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतरच हे खेळ एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा दबाव होता. 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आता तो 2021 मध्ये खेळला जाईल. कोविड -19 मुळे आतापर्यंत जगभरात 17,000 हून अधिक लोक मरण पावले आहेत.

काय म्हणाले जपानचे पंतप्रधान ?
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला हे खेळ एक वर्ष पुढे ढकलण्याचे आवाहन केले असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे. ज्यावर आयओसीने सहमती दर्शविली आणि गेम्सचा महाकुंभ एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. शिंझो आबे यांनी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी बोलल्यानंतर सांगितले की, “मी टोकियो ऑलिम्पिक एक वर्षासाठी पुढे ढकलण्याची मागणी केली होती आणि अध्यक्ष बाक यांनी ती मान्य केली.”

कॅनडा-ऑस्ट्रेलियाने आयओसीला दिला धक्का
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओसी) ऑलिम्पिक खेळ तहकूब करण्यास कठोर पाऊल उचलले नाही, तेव्हा कॅनडाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याची घोषणा केली. कॅनडाच्या ऑलिम्पिक समिती (सीओसी) आणि कॅनेडियन पॅरालंपिक समितीने (सीपीसी) म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये तो भाग घेणार नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीने सोमवारी आपल्या खेळाडूंना सांगितले की, त्यांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 लक्षात घेऊन ऑलिम्पिकसाठी सर्वांनी तयारी करावी.