साईंभक्तांकडून होणार आता टोलवसुली, शिर्डी नगरपंचायतीचा ठराव

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन –  शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर देण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतीने केला आहे. नगरपंचायतीने राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून सरकारच्या परवानगीनंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर कर गोळा करण्यासाठी नाके सुरु होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केलेल्या या ठरावाला राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मात्र विरोध केला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

देशभरातून दररोज हजारो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतला गावातील स्वच्छतेचा मोठा भार पडतो. त्यामुळे साईभक्तांना शिर्डीत येताना प्रवेशकर द्यावा लागत होता. मात्र, भक्तांना हा त्रास होवू नये यासाठी 2005 साली शिर्डी संस्थानचे तात्कालीन अध्यक्ष कै. जयंत ससाणे यांनी शिर्डी स्वच्छतेसाठी नगरपंचायतला लागणारा निधी साईसंस्थानने देण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून दरमहा साईसंस्थानकडून नगरपंचायतला 42 लाख दिले जात होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात गेल्या मे महिन्यापासून साईसंस्थानकडून दिला जाणार निधी अचानक बंद केल्याने नगरपंचायत समोर स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साई संस्थानने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक निधी देणे बंद केल्याने आता प्रवेशकर गोळा करण्याचा ठराव नगरपंचायतने केला आहे.