MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. आयोगाकडून आयोजित विविध प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्जप्रणाली किंवा सर्वसाधरण प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे. आयोगाकडून 1800-1234-275 आणि 1800-2673-889 या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्राची (हेल्प डेस्क/कॉल सेंटर) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची माहिती आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

या टोल फ्री क्रमांकावर सद्यस्थितीत ऑनलाइन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरूपाच्या अडचणी, शंकांचे निवारण करण्यात येणार आहे. याशिवाय ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक, सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. आयोगाने दिलेले दोन्ही टोल फ्री क्रमांक मंगळवारपासून कार्यान्वित होणार आहेत. या क्रमांकावर प्राप्त होणारे दूरध्वनी संभाषणाचे आयोगाच्या कार्यालयाकडून संनियंत्रण व विश्लेषण केले जाणार आहे.

आयोगाने दिलेले दोन्ही टोल फ्री क्रमांक मंगळवार (दि.2) पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 8 आणि शनिवारी व रविवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत कार्यान्वित राहणार आहेत. तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविध्येव्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या इमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.