खेड-शिवापूर टोल नाक्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! टोल दरात वाढ, जाणून घ्या

खेड-शिवापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्याच्या टोल दरात गुरुवार (दि. 1) पासून 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी 1 एप्रिलपासून टोल दर बदलले जातात. त्यानुसार यंदाही टोल नाक्यावरील टोल दर बदलले असून पुढील एक वर्षांसाठी 3 टक्के दरवाढ केल्याचे टोल नाका प्रशासनाने सांगितले. कार आणि जीप या वाहनांना पूर्वी 95 रुपये टोल आकारला जात होता. त्यात 5 रुपयांची वाढ केली असून या वाहनांना आता 100 रुपये टोल आकारले जाईल.

हलक्या व्यावसायिक वाहनांना पूर्वी 155 रुपये टोल होता. त्यात 5 रुपयांची वाढ केली आहे. सुधारीत टोल दरानुसार या वाहनांना आता 160 रुपये टोल द्यावा लागेल. बस आणि ट्रक या वाहनांना पूर्वी 325 रुपये टोल होता. त्यात 15 रुपयांची वाढ केली असून या वाहनांना आता 340 रुपये टोल द्यावा लागेल. अवजड वाहनांंना पूर्वी 515 रुपये टोल होता. त्यात 15 रुपयांची वाढ झाली असून वाहनांना आता 530 रुपये मोजावे लागतील. अती अवजड वाहनांना पूर्वी 625 रुपये टोल होता. त्यात आता 20 रुपयांची वाढ झाली असून 645 रुपये टोल आकारण्यात येईल. तर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारला जाईल.

स्थानिक अव्यावसायिक वाहनांच्या फास्टॅग मासिक पाससाठी पूर्वी 275 रुपये आकारले जात होते. त्यात 10 रुपयांची वाढ झाली असून आता 285 रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, टोल दर बदलण्याच्या प्रक्रियेत टोल दर कमी, जास्त होऊ शकतात. गेल्या वर्षी खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात वाढ झालेली नव्हती. यावर्षी मात्र टोल दर वाढले असून त्यात 3 टक्के वाढ झाली आहे.