राम मंदिराच्या नावाखाली भाजपची ‘टोल वसुली”, नाना पटोले यांचा घणाघाती आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून देशभरात निधी संकलन अभियान राबवलं जात आहे. या अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिला आहे का ? ते कोणत्या नियमाखाली देणगी जमा करत आहेत ? राम मंदिराच्या नावाखाली भाजपची ‘टोल वसुली’ सुरु असल्याचा आरोप पटोले यांनी विधानसभेत केला.

नाना पटोले यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, ज्याने राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जातोय, अशी एक तक्रार देखील आपल्याकडे आली असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात भगवान रामाच्या नावानं पैसे जमा करणारे हे लोक कोण ? त्यांना ठेका दिला आहे का ? केंद्र सरकारनं याचे उत्तर द्यायला हवं, असे सवाल उपस्थित करुन नाना पटोले आक्रमक झाले.

नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी नाना पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित केलं.

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राम मंदिरावर बोलायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र चर्चा लावा. ही राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा नसून राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा असून त्यावर बोला. आणि ज्यांना खंडणी वसुली करायची सवय आहे, त्यांना समर्पण कळू शकत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.