काँग्रेसला मोठा झटका : गांधी कुटुंबियांच्या ‘या’ निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी काँग्रेस आणि गांधी घराणे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. टॉम वडक्कन हे गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे होते. याशिवाय युपीए सरकारच्या काळात वडक्कन सोनिया गांधींचे सचिवही राहिले आहेत. टॉम वडक्कन यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांचे सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं.

काँग्रेस सोडत भाजपत प्रवेश करण्यावर टॉम वडक्कन म्हणाले कि, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जेव्हा आपल्या देशावर हल्ला केला. त्यावेळी माझ्या पक्षांनी दिलेल्या प्रतिक्रिया मन दुखावणाऱ्या होत्या. राजकीय पक्ष देशाच्या विरोधात असणाऱ्या गोष्टींचे समर्थन करत असल्याने माझ्याकडे पक्ष सोडण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच ‘काँग्रेसमध्ये वंशपरंपरेचं राजकारण फोफावतंय. काँग्रेस सोडणं आणि भाजपामध्ये सामील होणं हा विचारसरणीचा नाही तर देशप्रेमाचा प्रश्न आहे.’

नोटाबंदी, बेरोजगारी या मुद्दावरून वडक्कन यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती. केरळमधून भाजप उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित आहे. गांधी कुटुंबातील इतका जवळचा नेता भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमधल्या अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.