टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती आवाक्यात आणण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या बर्‍याच भागात टोमॅटोचे दर 80 रुपयांच्या पुढे गेले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. टोमॅटोचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने या समस्येवर एक अनोखा तोडगा काढला आहे. टोमॅटो प्युरी मदर डेअरी आणि सरकारी दुकानात (सफल स्टोअर्समध्ये) विकली जाईल, असा मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. आजपासून (शुक्रवार) टोमॅटो प्युरी स्वस्त दराने उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, टोमॅटोच्या साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने एसडीएम पातळीवरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक टीम स्थापन केली आहे.

10 दिवसात मिळतील स्वस्त टोमॅटो –

ग्राहक व्यवहार सचिव अविनाशकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टोमॅटोच्या किंमतींवर चर्चा झाली. चर्चेत उपस्थित कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम केला आहे. पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सुमारे 10 दिवस लागू शकतात.

कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या सर्व मोठ्या टोमॅटो उत्पादक राज्यांनी विशेषत: ज्या भागात टंचाई आहे अशा ठिकाणी टोमॅटोचा पुरवठा वाढवावा असे आवाहन सरकारने केले आहे.

गुरुवारी दिल्लीच्या आझादपूर मंडईमध्ये टोमॅटोची घाऊक किंमत 12-46 रुपये प्रतिकिलो होती तर दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ किंमत 40-70 रुपये प्रति किलो होती. दिल्लीत टोमॅटोची आवक 514.1 टन होती.

आजपासून मिळणार स्वस्त टोमॅटो प्यूरी –

सफल स्टोअर्समध्ये 200 ग्रॅम टोमॅटो प्यूरीचा एक पॅक 25 रुपयांना मिळेल, जो 800 ग्रॅम टोमॅटोच्या बरोबरीचा आहे. यापेक्षा मोठा 825 ग्रॅम टोमॅटो प्युरीचा एक मोठा पॅक ग्राहकांना 85 रुपयांना मिळणार आहे,जो 2.5 किलो टोमॅटोच्या बरोबरीचा आहे.

म्हणून टोमॅटोच्या किमती वाढल्या –

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोचे पीक खराब केले. टोमॅटो एक नाशवंत भाजी असल्याने पावसामुळे अधिक नुकसान होते म्हणूनच टोमॅटो च्या किंमती वाढल्या आहेत.

visit : Policenama.com