रोहित पवार पहाटेच पोहचले APMC मार्केटमध्ये, म्हणाले – ‘कदाचित मलाही ईडीची नोटीस येईल’

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा सकाळी सकाळी एखाद्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. पुण्यातील मेट्रोची पाहणी त्यांनी अशीच पहाटे केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज पुतणे आमदार रोहित पवार (Mla rohit pawar) हे एपीएमसीमधील भाजी व फळ मार्केटमध्ये पहाटे ४ वाजता पोहचले. यावेळी आमदार रोहित पवार (Mla rohit pawar) यांनी एपीएमसीमधील व्यापारी तसेच काही शेतकऱ्यांशी संवाद साधत चर्चा केली़ .

एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला़ शेतकरी आणि व्यापार्‍यांना एपीएमसीमध्ये येणार्‍या अडचणी येत्या अधिवेशनात मांडण्यासाठी व त्यांचे कामकाज जाणून घेण्यासाठी आज भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार यांच्या भेटीमुळे महापालिका निवडणुकांमध्ये ते सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

यावेळी रोहित पवार यांनी भाजपावर टिका करताना सांगितले की, कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असे महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबाबत रोहित पवार म्हणाले.

शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याने ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले.