उद्या कुल-थोरात :आमने – सामने’, दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शनाची शक्यता

पुणे (दौंड) : पोलीसनामा ऑनलाइन – दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे उद्या सकाळी ११ वाजता दौंड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या निमित्ताने दोन्ही प्रतिस्पर्धी कुल आणि थोरात गट आमने सामने उभे ठाकणार आहेत. विद्यमान आमदार राहुल कुल हे रासप, भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट या महायुतीच्या वतीने तर रमेश थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विद्यमान आ. राहुल कुल हे दौंड तालुक्यात त्यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर आणि त्यांच्या असंख्य स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवत असून माजी आमदार रमेश थोरात यांचा राहुल कुल यांनी केलेल्या विकासकामांवरील निधीच्या आकड्यांवर आक्षेप घेत असून त्यावर सध्या ते जास्त भर देताना दिसत आहेत. विकासकामांवर असलेला आक्षेप दूर करण्यासाठी समोरासमोर बोलण्याचे राहुल कुल यांनी केलेले अवाहन रमेश थोरात यांनी एकदा स्वीकारले होते परंतु या विषयावर अजूनतरी ते समोरा समोर आले नाहीत. मात्र उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कुल आणि थोरात यांच्या सभा होणार असून त्यावेळी ते काय बोलतात याबाबत दौंडकरांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

तालुक्यातील विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी आमदार रमेश थोरात यांना विद्यमान आमदार राहुल कुल यांनी तुमच्या २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात जेवढा निधी आणला असेल त्या निधीच्या चौपट निधी जर मी दौंडमध्ये आणला नसेल तर आपण आगामी निवडणूक लढणार नाही असे आव्हान देत जर मी आणलेला निधी हा तुमच्या पेक्षा चौपट निघाला तर मात्र तुम्हीही निवडणूक लढू नका असे जाहीर आवाहन केले आहे. विद्यमान आमदार राहुल कुल यांनी विकासकामांचा जाहीर अहवाल छापून तो थेट जनतेच्याच हातात दिला असल्याने उद्या माजी आमदार रमेश थोरात याबाबत काय बोलतात आणि आ. राहुल कुल त्यावर कसा पलटवार करतात हे उद्या समजणार आहे.

Visit : Policenama.com