शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंनी दिले उत्तर, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. दरम्यान परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे. याकरिता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून चौकशी केली जावी, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिबेरो यांनी एनडीटीव्हीशी बोलताना आपल्याला ऑफर दिली तरी हे काम करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीला मी स्पर्श करु इच्छित नाही. हे प्रकरण अत्यंत अवघड असून या सगळ्याचा शेवट कुठे घेऊन जाईल हे मला माहिती नाही. त्यामुळे राजकारण्यांनीच यावर तोडगा काढून परिस्थिती पूर्ववत करावी असे त्यांनी म्हटले आहे.

रिबेरो म्हणाले की, माझे वय 92 वर्ष असून, अशा चौकशांसाठी मी समर्थ नाही. मात्र, समर्थ असतो तरी चौकशीस मी नकार दिला असता. जर आयपीएस अधिकाऱ्यांची नाव खंडणी प्रकरणात संशयित म्हणून येत असतील तर आपल्या सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. रिबेरो 1982 ते 1986 या काळात मुंबई पोलीस प्रमुख होते. यानंतर ते गुजरात आणि पंजाबमध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आपल्या कार्यकाळात अशी कोणतीही गोष्ट घडली नसल्याचे ते म्हणाले आहेत.

सचिन वाझेंना दमरहा 100 कोटींची वसुली करण्यास गृहमंत्री देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. मात्र असे असते तर परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन हे थांबवावे असे सांगण्याची गरज होती. जर गृहमंत्र्यांनी नकार दिला असता तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. एक प्रामाणिक आणि सरळमार्गाने चालणाऱ्या अधिकाऱ्याने हेच केल असते असेही रिबेरो यांनी म्हटले आहे. वाझे यांच्यावरील आरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले की, वाझे थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करत होते. कोणाचाही आशीर्वाद नसताना वाझे इतक सगळ कसे काय करू शकतात. ते फक्त एसीपी आहेत, जी खूपच छोटी रँक असल्याचे ते म्हणाले.