Cyber Security : बनावट वेबसाईटवरून ‘पेमेंट’ करण्यापासून दूर रहा, नेहमी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठं ‘नुकसान’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बनावट वेबसाइट्सद्वारे फसवणुकीच्या बातम्या तुम्ही बर्‍याचदा वाचल्या असतील. ई-कॉमर्स, सरकारी योजना, सरकारी पावत्या किंवा डिजिटल पेमेंट असो, मोठ्या संख्येने लोकांचे बनावट वेबसाइटवर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी भारत-चीनमधील तणाव वाढला आहे आणि अशा परिस्थितीत चीनकडून सायबर हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भारतातील सायबर सिक्युरिटीची नोडल एजन्सी इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ने नुकतेच देशातील सरकारी विभाग आणि विविध संस्थांना हॅकिंगचा इशारा दिला आहे.

एजन्सीनुसार, हॅकर्स कोविड-१९ च्या नावाने सायबर हल्ले करू शकतात. सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असलेल्या एजन्सी, विभाग आणि व्यवसायिक संस्था यांच्या नावाच्या बनावट वेबसाइट्सवर लोकांना नेण्यासाठी आणि नंतर त्यांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती घेण्याचा हॅकर्स प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी अत्यंत सावध असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया बनावट वेबसाइट कशा ओळखाव्यात आणि आपले पैसे कसे सुरक्षित ठेवायचे…

दोन प्रकारे होते फसवणूक
वेबसाइटवर फसवणूक दोन प्रकारे होते. एकतर खऱ्या वेबसाइटसारखी बनावट वेबसाइट तयार केली जाते किंवा खरी वेबसाइट हॅक केली जाते. सायबर तज्ञ प्रिया सांखला यांच्यानुसार बनावट वेबसाइट्स ओळखणे सोपे आहे. कोणतीही जागरूक व्यक्ती थोडी सतर्क असेल, तर ती बनावट वेबसाइटवरून होणाऱ्या फसवणूकीपासून स्वत:ला वाचवू शकते. तसेच एखादी वेबसाइट हॅक झाली आहे की नाही हे ओळखणे देखील अवघड आहे. जोपर्यंत संबंधित कंपनी, विभाग किंवा संस्था सूचना देत नाही किंवा हॅकर वेबसाइटवर कोणतीही विशिष्ट माहिती देत नाही तोपर्यंत वेबसाइट हॅक झाल्याचे माहित होणे सामान्य माणसाला कठीण आहे.

अशा प्रकारे ओळखा बनावट वेबसाईट

एकाच नावाचे दोन डोमेन कधीही नसतात. त्यामुळे वेबसाइटला भेट देता, तेव्हा दोनदा डोमेन नेम तपासा. वेबसाइटवर मोठी सूट किंवा पैसे देण्यास सांगितले जात असल्यास अशा परिस्थितीत वेबसाइटचे डोमेन नेम नक्की तपासा. डोमेन नेम बरोबर नसेल आणि जुळले नाही, तर ती एक बनावट वेबसाइट आहे.
एखाद्या वेबसाईटवर ओटीपीशिवाय कार्ड पेमेंट होत असल्यास, ती वेबसाइट पुन्हा वापरू नका. अशी वेबसाइट ३डी सुरक्षा असलेली नसते. प्रिया सांखला यांच्यानुसार, अशा परिस्थितीत ग्राहकांनी त्यांचे कार्डदेखील ब्लॉक केले पाहिजे.

आपण एखाद्या नवीन वेबसाइटला भेट देत असल्यास वेबसाइटचा कन्टेन्ट, त्याची प्रायव्हेट पॉलिसी, त्याची माहिती, टीम इन्फो, फोन, ईमेल आणि गुगल सूची तपासून देखील चौकशी करू शकता. ही सर्व माहिती उपलब्ध नसल्यास ती वेबसाइट अत्यंत संशयास्पद असते.

जर आपण एखाद्या नवीन ई-कॉमर्स वेबसाइटला भेट देत असाल, तर त्याची रिटर्न पॉलिसी पाहून आणि कस्टमर सपोर्टवर संपर्क साधून देखील तुम्हाला विश्वासार्हताही कळू शकेल. ज्या वेबसाईट सेवा आणि उत्पादने प्रदान करतात, त्या वेबसाईटवरील काही ग्राहकांचा ऑनलाइन रिव्यू वाचला पाहिजे. सायबर तज्ञ सांखला यांच्यानुसार, ग्राहक ज्या वेबसाइटवर पेमेंट करतात, ती एसएसएल सिक्युरिटीसह नक्की असली पाहिजे. म्हणजे त्या वेबसाइटच्या URL समोर लॉकचे चिन्ह असेल किंवा ती https ने सुरू होत असेल.

या गोष्टीही ठेवा लक्षात
कधीही पेमेंट करण्यासाठी ईमेल, एसएमएस किंवा सोशल मीडिया मेसेंजरवर प्राप्त केलेल्या लिंकचा वापर करू नका. ते तुम्हाला बनावट वेबसाइटवर पोहोचवू शकते. सांखला यांच्या म्हणण्यानुसार, बर्‍याच वेळा बनावट वेबसाइट्स ग्राहकांना पॉप-अपच्या माध्यमातून लॉटरीबद्दल माहिती देतात. त्यांना सदस्यता घेण्यास सांगतात. एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगतात किंवा युजरला डोनेशन देण्यास सांगतात. युजरने आपली बँकिंग माहिती बनावट वेबसाइटवर टाकताच ती फसव्यांकडे जाते आणि ते युजरचे खाते रिकामे करतात.

जेव्हा एखादी बनावट वेबसाइट तुम्हाला पीडीएफ किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगते आणि युजरने ती डाउनलोड केली, तर युजरच्या सिस्टमचा डेटा त्या सॉफ्टवेअरद्वारे फसवणूक करणार्‍याकडे जातो. हे टाळण्यासाठी युजरने नेहमी राष्ट्रीय वेबसाईट्सवर दिलेल्या लिंकद्वारे किंवा URL टाइप करून वेबसाइटवर जावे. तसेच एखादी डिजिटल पेमेंट वेबसाईट हॅक होते, तेव्हा सीसीव्ही आणि पिनशिवाय त्या वेबसाइटवर आधीपासूनच उपलब्ध असलेली सर्व माहिती हॅकरकडे जाते.