LIC चे MD विपिन आनंद म्हणाले – Insurance Sector कडे 50 लाख लोकांना रोजगार देण्याची ‘क्षमता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे एकीकडे लोक अनेक क्षेत्रात आपल्या नोकर्‍या गमावत आहेत, तर असेही एक क्षेत्र आहे, जिथे येत्या काही दिवसांत रोजगार मिळण्याची दाट शक्यता आहे. ते विमा क्षेत्र. कोरोना विषाणू महामारीने लोकांना विम्याबाबत खूप जागरूक केले आहे. यामुळे जीवन विमा आणि आरोग्य विमाकडे लोक वेगाने आकर्षित होत आहेत. भारतीय जीवन विमा महामंडळाचे एमडी विपिन आनंद यांचे म्हणणे आहे की, विमा क्षेत्रात सुमारे ५० लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे.

आनंद यांनी सांगितले की, सध्या अन्न, कपडे आणि घर यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन विमा. ते म्हणाले की एलआयसी इंडिया आणि खाजगी कंपन्यांचे धोरण एकत्र केले, तर सुमारे ४५ कोटी लोकांकडे विमा आहे आणि ९० कोटी लोकांना अद्याप जीवन विम्याची गरज आहे. ते म्हणाले की, आत्ता मुले व महिलांसह प्रत्येकासाठी योजना उपलब्ध आहेत. अशात हे ९० कोटी लोक त्यांचे भावी ग्राहक आहेत.

आनंद म्हणाले, ‘देशातील या मोठ्या लोकसंख्येला विमा देण्यासाठी मोठ्या संख्येने मार्केटिंग चॅनेल्स आणि मार्केटिंगच्या लोकांची आवश्यकता आहे. आज आमच्याकडे ११ लाखाहून अधिक एजंट्स आहेत आणि ९ लाखाहून अधिक एजंट्स खासगी कंपन्यांमध्ये आहेत. अनेक बँका, कॉर्पोरेट संस्था आणि एनजीओ आज विम्याचे काम करत आहेत. ब्रोकर्स विमा विकण्याचे काम करत आहेत. थेट ऑनलाईनदेखील मार्केटींग होत आहे. पण हे सर्व असतानाही दर वर्षी विमा उतरणार्‍या लोकांच्या संख्येत काही वाढ झालेली नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘आजही आमची ९० टक्के पॉलिसी एजंट्समार्फत केली जाते. बाजारपेठ किती मोठी आहे आणि किती लोकांना विम्याची गरज आहे हे पाहिले तर संपूर्ण भारतात लोकांचा विमा करण्यासाठी कमीतकमी ५० लाख एजंट्सची आवश्यकता असेल. म्हणजेच विमा क्षेत्रात आणखी ५० लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे.’

आनंद म्हणाले, ‘आपण अनेक वर्षातही लोकांना जीवन विम्यासाठी तितकेसे जागरूक करू शकलो नाही, जितके कोरोना महामारीने केले आहे. ही विमा क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. जर जास्तीत जास्त लोकांनी जीवन विमा मार्केटिंगला आपला व्यवसाय बनवला, तर त्यांना केवळ सुरक्षित रोजगारच मिळणार नाही तर सोबतच एक व्यावसायिक करिअर करण्याची संधी देखील मिळेल.’