संतापजनक ! गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पदार्फाश झाला आहे. उपचारासाठी सात दिवस बंद घरात डांबून ठेवलेल्या या १७ वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने पाच दिवस सतत अत्याचार केला. पोलिसांनी ढोंगी बाबाला अटक केली आहे. लंकेश ऊर्फ वामनराव मेश्राम (वय ३०, रा. फुलचूर) असे या ढोंगी बाबाचे नाव आहे.

गोंदिया शहरातील एका कुटुंबातील महिला मंडळी आरोग्याला घेऊन त्रस्त होती. त्यातच त्यांच्या घरातील एका १७ वर्षाच्या मुलीच्या छातीला गाठ आली आहे. ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा मेश्राम या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी २७ मार्चला बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली. त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना तो १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पिडीत मुलीलाच नव्हे तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी देण्याचे काम त्याने केले. त्यानंतर गुंगीत असलेल्या त्या पिडीतेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिची मावशीही त्या पिडीतेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते.

त्यामुळे तिची मावशी सुध्दा त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पिडीतेवर अत्याचार केला. परंतु त्याचा विरोध कुणीच करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात माणसांना ढोगीं बाबाने गुंगीचे औषध दिले. सातपैकी ८-८ वर्षाची दोन मुले व पाच महिला-मुली होत्या. ३१ मार्चला त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही. १ ते ४ एप्रिल दरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली.

पिडीतेचे वडील व काका कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. काका बाहेरगावावरून आल्यानंतर आपल्या पत्नीला बोलाविण्यासाठी पिडीतेच्या घरी गेले. परंतु त्या घराला बाहेरून कुलूप लावले होते. ते कुठे गेले याची शेजाऱ्यांना विचारणा केली असता आठवडाभरापासून कुलूपच असल्याचे सांगण्यात आले. परंतु लोक आत आहेत असेही सांगण्यात आले. त्यांनी त्यावर त्या घराचे कुलूप तोडले. त्यावेळी सर्व लोक गुंगीत घरातील कानाकोऱ्यात झिंगून पडले होते. आरोपी देखील एका कोपऱ्यात पडून होता. लोक गोळा झाले आणि हे प्रकरण उघडकीस आले.

अत्याचाराची ही घटना गावकऱ्यांना समजताच त्यांनी या ढोंगी बाबाला चांगलाच चोप दिला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नराधमाला उपचारासाठी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.