माझा जो छळ झाला त्याची माफी मागणार का ? : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळ : वृत्तसंस्था – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला, असे वादग्रस्त विधान भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. त्यांनतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुन्हा एकदा आज सकाळी पत्रकार परिषद घेत माझ्यावर जो छळ झाला त्याची माफी मागणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट खटला –

साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. त्या ९ वर्षं तुरुंगात होत्या. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचे तपास अधिकारी होते. म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांनी करकरेंवर निशाणा साधला होता. आपण आजारी असून, स्तनांचा कर्करोग झाला आहे, कोणाच्याही आधाराशिवाय आपल्याला चालता येत नाही, अशी विनंती करून त्यांना जामिनासाठी अर्ज केला आणि त्याच कारणामुळे तो न्यायालयाने मंजूर केला. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात त्या लढत देत आहेत.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह –

हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या होत्या की , ‘हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरूंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले.

त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. भाजपानेही या विधानाशी आपला संबंध नाही असे सांगून हात वर केले होते. असे असतानाच त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली व माझ्यावर जो छळ झाला त्याबद्दल तुम्ही माफी मागायला लावू शकता का ? असा प्रश्न प्रसिद्धी मध्यमांना विचारला आहे. त्यामुळे साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटू शकतं.