आईला जिवे मारण्याची धमकी देत वर्षभर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – आईला जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर गेली वर्षभर अत्याचार केला असून, ती सध्या गर्भवती असल्याचे लक्षात येताच ही घटना उघडकीस आली आहे. नराधमावर बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई लोणी स्टेशन परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहते. तिच्या सोबत कोणीही नसल्याने शाम भाऊराव पवार यासह ती राहत असे. ती कामानिमित्त बाहेर गेल्यावर या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करत अत्याचार करत होता. याची कुठे माहिती दिली तर तुझ्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली.

ही पीडित मुलगी आईच्या जिवाच्या भीतीने अत्याचार सहन करत राहिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पोटात दुखत असल्याने तिच्या आईने दवाखान्यात तपासणी केली असता, ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे कळले. यावर तिच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व घटनाक्रम समोर आला. यावर संबंधित महिलेने शाम माने याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीवर ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. रणवरे करीत आहेत.