राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांना 2021 मध्ये 19 सुट्ट्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य सरकारकडून सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वर्षातील सुट्ट्यांचे दिवस जाहीर करण्यात आले आहेत. 2021 मध्ये कर्मचा-यांना एकूण 19 सुट्ट्या आल्या आहेत. त्यात पाच सुट्ट्यांच्या दिवशी रविवारी आल्याने त्याचा काही प्रमाणात तोटा सरकारी कर्मचा-यांना दिसून येत आहे.

नवीन वर्षाला आता काहीसे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. नवीन वर्षात सुट्ट्यांचे नियोजन बघण्याचा अनेकांचा प्रघात असतो. नववर्षात कोणती सुट्टी रविवारी आहे, कोणती शुक्रवारी आली आहे, याचे जोरदार नियोजन अनेकांनी सुरू केलेले असणार आहे. यंदा वर्षाची सुरुवात शुक्रवारने होणार असून, प्रजासत्ताकाची वर्षातील पहिली शासकीय सुट्टी 26 जानेवारीला मिळणार आहे, तर 19 फेब्रुवारी शुक्रवारी येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्याचा आनंद कर्मचा-यांना अगदी दीड महिन्याच्या अंतराने मिळणार आहे. राज्य सरकारने सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. 29 मार्चला होळीची सुट्टी सोमवारी आल्याने यातही सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. याशिवाय 2 एप्रिल, सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी व ऑक्टोबरमध्ये दसरा शुक्रवार असल्याने तेव्हादेखील सलग सुट्ट्यांचा आनंद सरकारी कर्मचा-यांना मिळणार आहे, तर दिवाळीच्या सणात सरकारी कर्मचा-यांची चांगलीच दिवाळी होणार असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीपूजन गुरुवारी, बलिप्रतिपदा शुक्रवारी व पुढील दोन दिवस सुट्टी असे सलग चार दिवसांची सुट्टी उपभोगता येणार आहे, तर त्याच महिन्यात गुरुनानक जयंती शुक्रवारी आहे. साहजिकच गेल्या वर्षातील ताण-तणावाचा शीण पुढील वर्षी घालवण्याची संधी शासकीय कर्मचा-यांना मिळणार असल्याचे दिसून येत आहे.