दिलासादायक ! देशात दिवसभरात 1 लाख 91 हजार 181 लोकांना देण्यात आली कोरोना प्रतिबंधात्मक लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आज जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एकूण 1 लाख 91 हजार 181 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, लस घेतलेल्यांपैकी एकावरही लस टोचल्यानंतर साइडइफेक्ट किंवा इतर कोणत्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे भारतासाठी हे सर्वात मोठ यश मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात देशातील कोविड योद्ध्यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 3 कोटी लोकांना लस देण्याची योजना केंद्राने आखली आहे. कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे.

आरोग्यमंत्री आनंदी अन् समाधानी
कोरोनावरील लस या महामारीच्या विरोधात संजीवनी सारख काम करेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. मी अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई लढत आहोत. कोरोनावरील ही लस संजीवनी म्हणून काम करेल. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.