मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये वाद, पूल पार करून यायला सांगितल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्थानिक प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावापासून करणार होते. मात्र प्रशासनाकडून गावकऱ्यांनाच पूल पार करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावण्यात आले, त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी गावात यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर यायला सांगितले. स्थानीक शासकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना पुलावर या असे सांगण्यात आले होते.

मुख्यमंत्री गावात आले तर ठीक नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांकडून घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौरा सांगवी खुर्द या गावापासून सुरु करण्यात येणार होता. शासकीय अधिकारी आता ऐन वेळी कार्यक्रमात बदल करत आहेत त्यामुळे गावकरी संतापले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नदीच्या पुलावरून आमची पडझड झालेली घरे आणि नुकसान कसे दिसणार ? हा मुद्दा ग्रामस्थांकडून मांडण्यात आला आहे. सांगवी खुर्द गावाचे सरपंच बबन पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी पुलावरुन गावात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सकाळी सोलापुरात आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात जाणार होते पण विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या बांधावर वळवला आणि ते अक्कलकोट तालुक्याच्या दिशेने रवाना झाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीकर, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांच्याकडुन त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसोबत खासदार विनायक राऊतदेखील हजर होते. विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी काही नेत्यांसोबत जुजबी चर्चा केली. चला आपल्याला थेट शेतकऱ्यांना भेटायचे आहे असे सांगून आपला दौरा त्यांनी अक्कलकोटच्या दिशेने वळवण्याचे त्यांनी पोलिसांना आदेश दिले.