पुणे : ‘त्या’ परिसरात 2 खूनाच्या घटना झाल्या अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहर पोलीस दलात गेल्या काही दिवसात चर्चेत आलेल्या येरवडा पोलीस ठाण्याच्या “डीबी” पथकात महिला राज आणत आयुक्तांनी वेगळा निर्णय घेतला खरा पण दोन खुनानंतर पुन्हा हा निर्णय बदलण्याची वेळ आली आहे. आता तिथे पुन्हा नव्या दमाच्या अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या “संधीचे सोने” ते कसे करतात हे पहावे लागणार आहे.

शहरात 30 पोलीस ठाणी आहेत. त्यात काही पोलीस ठाणे हे हॉट पोलीस ठाणे मानले जातात. तिथे क्राईम रेट जसा आहे तसाच गोरख धंद्यांना देखील वाव तितकाच आहे. त्या पोलीस ठाण्यातील वसुली भाईच्या कारनाम्यामुळे पोलीस ठाणे डोळ्यावर आले होते. हद्दीत कारवाई करण्यास आलेल्या पथकांना देखील परत यावे लागत असे. आयुक्तांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर वसुली भाईला मुख्यलयाचा रस्ता दाखवत डीबी पथकच “रिफ्रेश”करून त्या ठिकाणी महिला राज आणले होते. महिला उपनिरीक्षकांच्या हाती सूत्रे देऊन पूर्ण स्टाफ देखील महिलांचाच नेमण्यात आला होता. पण हे महिला राज जास्त दिवस टिकू शकले नाही. त्यांना येथे आपले काम दाखवते आले नाही आणि त्याचा गुन्हेगारीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली.

गेल्या महिन्यात येरवडा भागात लागातार खुनाच्या घटना घडल्यानंतर या डीबी पथकाला म्हणावे तसे काम करता आले नाही. मग मात्र हा निर्णय बदलत पुन्हा एकदा नव्या दमाच्या अधिकाऱ्यावर डीबी पथकाची धुरा देण्यात आली आहे. आता सहायक पोलिस निरीक्षक ननावरे यांच्याकडे डीबीचा चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे या नवीन डीबीला या संधीचे सोने करता येते का हे पहावे लागणार आहे.