बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पीडितेला जिवंत जाळलं, घटना CCTV मध्ये कैद

हनुमानगड/राजस्थान : वृत्तसंस्था – बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पीडितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील हनुमानगड येथे घडला आहे. आरोपीने पीडितेला रॉकेल टाकून जिवंत जाळले असून या घटनेत ती 90 टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर असून सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीने केलेले हे कृरकृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

प्रदीप बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने दोन वर्षापूर्वी प्रदीप याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. दरम्यान, आरोपी जामिनावर बाहेर आला आहे. पीडितेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून काही दिवसांपासून ती आपल्या पतीपासून विभक्त होऊन आजीकडे राहण्यास आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या आजीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीकडे चौकशी सुरु आहे.

पीडित महिलेच्या आजीच्या घराजवळ सीसीटीव्ही लावण्यात आला आहे. यामध्ये एक तरुण दुचाकीवरुन येताना दिसत असून ब्युटी पार्लरच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो बाहेर पळून जाताना दिसत आहे. आरोपी घराच्या भिंतीवरुन पीडितेच्या घरात आला. त्यानंतर तो मुख्य गेटमधून बाहेर पळून गेला, असे आजीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

घटनेच्या दिवशी आरोपी घरी आला. त्याने पीडितेला घराबाहेर बोलावून घेतले. त्याने सोबत आणलेले रॉकेल पीडितेच्या अंगावर टाकून तिला जिवंत जाळले. त्यावेळी पीडित महिलेने सिथेटिक कपडे घातले असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. पीडितेला जाळल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पलायन केले. पीडितेच्या आजीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.