दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले होते. आंदोलनकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने काही पोलीस जखमी झाले आहेत. तर काही महिला पोलिसांवर देखील हल्ले झाल्याने दिल्ली पोलीस आयुक्तांनी उपद्रवी आंदोलनकर्त्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र असून तलवार आणि लाठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाच दृष्य पहायला मिळालं होतं. दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्रालय देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राष्ट्रीय राजधानीतील सद्यस्थिती लक्षात घेता निमलष्करी दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यापैकी 10 तुकड्या CRPF तर 5 इतर अर्धसैनिक दलाच्या असणार आहेत. त्याचवेळी दिल्ली पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिसांना संपूर्ण ताकदीने उपद्रव्यांचा सामना करण्याचे आदेश दिले आहेत.