शेतकरी आंदोलन : आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू`

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली. पोलिसांसोबत दोन हात करत अखेर ही रॅली दिल्लीच्या लालकिल्यावर धडकली. दरम्यान, ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलंय. या आंदोलनादरम्यान दिल्लीच्या आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

गोळी लागल्याने आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येतोय. हा गोळीबार पोलिसांकडून करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दीन दयाळ उपाध्याय मार्गावर हा दुर्दैवी प्रकार घडला. या मार्गावर एक ट्रॅक्टरही पलटलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृत शेतकरी ट्रॅक्टरवर स्वार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आयकर कार्यालयाजवळ पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. आंदोलनकर्त्यांकडून एका डीटीसी बसची तोडफोड देखील करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतापलेले आंदोलनकर्ते डीटीसी बस पलटवण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. तसेच याच भागात काही आंदोलकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला घेरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.