देशव्यापी संप ! आजपासून २ दिवस कामगार संपावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी आज व उद्या देशव्यापी संप पुकारला आहे. यामुळे देशभरातील केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, महामंडळे व कंपन्यांवे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील कामगार संघटनाही संपात सहभागी झाल्याने खासगी क्षेत्रावरही संपाचा परिणाम जाणवणार आहे. सध्या वीज कंपन्यांमधील कर्मचारी संपावर आहेत. त्यातच बँका, वाहतूक कामगार, महापालिका कर्मचारी आणि रिक्षाचालकही संपावर जाणार असल्याने सर्वच कामकाज ठप्प होणार आहे. औषध विक्रेत्यांनीही संप पुकारल्याने नागरिकांना दोन दिवस त्रास सोसावा लागणार आहे.

सार्वजनिक बँका, विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, वीज मंडळ, आरोग्य विभाग, अंगणवाडी, आशा कर्मचारी, कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षाचालक, बांधकाम मजूर आदी क्षेत्रातील कामगारांचा देशव्यापी संपात सहभाग असल्याने देशातील सर्वच कामकाजावर परिणाम होणार आहे.

नियमित स्वरूपाच्या कामासाठी कंत्राटी पद्धत बंद करावी. कंत्राटी कामगारांना कायम करावे. नीम योजनेखाली नियमित उत्पादनाचे काम करून घेण्याची प्रथा बंद करावी. कामगार कायद्यांमधील कामगार विरोधी बदल रद्द करावेत. संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकरी श्रमिकांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून निवृत्तीनंतर दरमहा ३००० निवृत्तीवेतन द्यावे. बोनस, भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी कमाल वेतन मर्यादा रद्द करावी. खासगीकरण थांबवावे, अंगणवाडी, आशा, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा तसेच रोजगार निर्मितीसाठी आवश्यक धोरण अवलंबवावे व बेरोजगार भत्त्याचीही तरतूद करावी, आदी मागण्या कामगार संघटनांतर्फे करण्यात आल्या आहेत. याच मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

महावितरण कंपनीच्या प्रस्तावित पुनर्रचनेमुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटणार असल्याने त्याविरोधात वीज अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपामुळे वीजसेवा विस्कळित झाली. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला असून, आज आणि उद्या कर्मचाऱ्यांनी देश पातळीवर पुकारलेल्या संपामध्येही वीज कर्मचारी सहभागी होणार आहेत. दोन दिवसांच्या देशव्यापी संपामध्ये इंटक, आयटक, सीटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू,सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियन आदी सहभागी होणार आहेत.