40 दिवसांपासून दुकाने बंद ! लॉकडाऊन वाढल्याने व्यापारी आक्रमक, योग्य तोडगा काढावा अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत रुग्णसंख्या नियंत्रणात आली नसल्याने आणि तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज असल्याने ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढवण्यात आल्याचे घोषीत केले. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन व्यापारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. योग्य तोडगा निघाला नाही तर राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.

विरेन शहा आज (गुरुवार) मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावळी बोलताना शहा म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांकडून कायद्याचे उल्लंघन होत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वस्तुंची ऑनलाईन विक्री सुरु आहे. अशाप्रकारे कायद्याची पायमल्ली होत असताना सरकार गप्प का आहे ? नियम हा सर्वांसाठी सारखा पाहिजे, असे विरेन शहा यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार व्यापाऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पहावे लागले.

आता महाराष्ट्रच अनलॉक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यापाऱ्यांची दुकाने मागील 40 दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे आता व्यापारी आक्रमक झाले आहे. बंदच्या कालावधीत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने काहीही करुन महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे, अशी मागणी विरेश शहा यांनी केली.

50 हजार कोटी रुपयांचे नुकसान

व्यापाऱ्यांची मगील 40 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. बंदच्या काळात सरकारला आरोग्य सेवा सुरळीत करण्याचा पुरेसा कालावधी मिळाला आहे. गेल्या 40 दिवसांपासून व्यापार बंद असल्याने तब्बल 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ठाकरे सरकार ‘मुंबई पॅटर्न’चा गाजावाजा देशभर करत आहे. आता राज्यातील रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे राज्य सरकाने अनलॉक केले पाहिजे, असे शहा यांनी म्हटले आहे.