Lockdown ला पुण्यातील व्यापार्‍यांचा विरोध, उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 13) रात्री जनतेला संबोधित करताना 15 दिवसांच्या कठोर निर्बंधाची घोषणा केली आहे. मात्र पुण्यातील व्यापा-यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातील व्यापाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. आता दुपारी चेंबर ऑफ कॉमर्सने बोलावलेल्या राज्यव्यापी बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत पुणे व्यापारी महासंघ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील व्यापारी वर्गाने सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. सरकार मोफत धान्य पुरवणार आहे. ते घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतील. तसेच शिवभोजन थाळीसाठीही रीघ लागेल. मग तेव्हा गर्दी होणार नाही का? त्यामुळे सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर पूर्णपणे अन्याय करणारा आहे. फक्त व्यापाऱ्यांमुळेच कोरोना पसरत आहे का, असा सवाल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. राज्यात संचारबंदी असेल तर मग शिवथाळी आणि रिक्षा सुरु ठेवण्याला परवानगी कशी काय देऊ शकता, असा सवालही व्यापा-यांनी केला आहे.