पारंपारिक सण बैलपोळा उत्साहात साजरा

बैलांना सजवून काढली मिरवणूक

पुणे : (लोणी काळभोर)  पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संस्कृतीत ॠतुनुसार वेगवेगळ्या सणांचे महत्व आहे. यामध्ये चातुर्मासात सणांची संख्या जास्त आहे त्यात नागपंचमी, राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी यासोबतच शेतकरी वर्गात आकर्षणाचा व उत्साह भरणारा सण बैलपोळा होय.

शेतकर्यांचा निश्चिम मित्र म्हणून बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानानामुळे या मित्रांचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. तरीही काही शेतकर्यांना या प्राण्याबद्दल आस्था असल्याने ते त्यांची आदरपूर्वक पालनपोषण करत आहेत. अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेताना दिसतात. या काळात बाजारपेठा मातीच्या चिखलापासून बनवलेल्या सुंदर व सुबक बैलांनी सजलेल्या दिसतात.

आज शनिवारी भाद्रपद अमावस्या महाराष्ट्रातील काही भागात बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांची छान सजावट करुन रंगीबेरंगी झुली अंगावर टाकून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. आज त्यांच्यासाठी पुरणपोळीची मेजवानी हे महत्त्वाचे असते. परंपरेप्रमाणे आज विवाह उत्सव साजरा केला जातो. गावातून मिरवून आणल्यानंतर बैलांचे घरातील सुवासिनी स्रिया औक्षवण करतात व विवाह सोहळा संपन्न होतो. यासाठी घरातली प्रत्येक व्यक्ती कामाला लागते. बच्चेकंपनी तर खुपच आनंदी असते.
उरुळी कांचन येथील किशोर मेमाणे यांनी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शेती विषयक माहिती तसेच प्रायोगिक माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. शेतीपूरक व्यवसाय कसा व कोणता करावा याबद्दल मार्गदर्शन देण्याचे काम चालू आहे आज त्यांनी आपल्या सर्व कुटूंबीयासह बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

Visit : Policenama.com