पुणे : कात्रज लेकटाऊनच्या कॉव्हर्टचे काम होणार पोलीस बंदोबस्तात

सुखसागर नगर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, हजारो नागरिकांना 'मनस्ताप'

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज येथील लेक टाऊन सोसायटी जवळील कल्व्हर्ट चे काम येत्या आठवडयाभरात तेही पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात येणार आहे. 25 सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी मुळे येथील कल्व्हर्ट वाहून गेल्याने राजस सोसायटी कडे जाणारी बससेवा बंद करण्यात आली असून पर्यायी सुखसागर नगर मधील अरुंद रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याने हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बिबवेवाडी आणि सातारा रस्त्याने लेक टाऊन सोसायटी समोरून राजस सोसायटी आणि कात्रज – कोंढवा रस्त्याकडे जाणारा पर्यायी रस्ता आहे. 25 सप्टेंबरला कात्रजकडील डोंगरभागात ढगफुटी झाली. यामुळे कात्रज येथील दोन्ही तलाव ओसंडून वाहात होते. यामुळे आंबील ओढ्याला पूर येवून मोठ्याप्रमाणात हानी झाली. या पुरातच लेकटाऊन येथील ओढ्यावरील कल्व्हर्ट व्हावून गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. विशेष असे की स्वारगेटहुन राजस सोसायटी कडे जाणाऱ्या पीएमपी बसेस देखील याच रस्त्याने जात. या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. राजस सोसायटी मध्ये दोन शाळा असून या परिसरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन ही याच रस्त्याचा वापर करत.

महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी याठिकाणी भेट देत काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान आयुक्त ट्रेनिंग साठी एक महिन्याच्या रजेवर गेले आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही सुरू होती. अशातच कल्व्हर्ट ज्या जागेवर आहे, ती जागा आपल्या मालकीची असून पालिकेने जागेचा मोबदला दिल्याशिवाय काम करू देणार नाही, अशी भुमिका कथित जागा मालकाने घेतली. यावर नुकसानभरपाई साठी प्रस्ताव दाखल करावा, असा पर्याय पालिका प्रशासनाने कथित जागा मालकाला दिला. परंतु कुठलाही प्रस्ताव दाखल न करता त्याने अडवणुकीचे धोरण कायम ठेवल्याने काम रेंगाळले.

अत्यावश्यक बाब म्हणून प्रशासनाने तातडीने रस्ता सुरू करण्यासाठी पूर्वी प्रमाणे पाईप टाकून कल्व्हर्ट बांधण्याची वर्क ऑर्डर दिली आहे. त्याचवेळी याठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यासाठी निविदाही काढली आहे. दरम्यान स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम, राणी भोसले, मनीषा कदम यांनी पुलाचे काम तातडीने व्हावे यासाठी सभागृहात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावाही केला आहे. परंतु जागा मालकाच्या आडकाठी मुळे काम सुरू होऊ शकलेले नाही.

नगरसेवक प्रकाश कदम यांनी काल पालिकेत रुजू झालेले आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कल्व्हर्ट चे काम सुरू करण्याची मागणी केली. आयुक्तांनी हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज पथविभागाने भारती विद्यापीठ पोलिसांकडे अर्ज करून पोलिस बंदोबस्त मागितला आहे. या आठवड्यात बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच कॉव्हर्टचे काम सुरू होईल, असा विश्वास पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Visit : policenama.com