‘त्या’ वाहतूक पोलिस हवालदारचा महिला सहाय्यक आयुक्तांकडून सन्मान, भररस्त्यातच केला सत्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी काळबादेवी भागात एका वाहतूक हवालदाराला शिव्या दिल्याच्या आरोपावरुन महिलेने कॉलर पकडून कानशिलात लागवल्या होत्या. त्यानंतर त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता, महिलेने सार्वजनिक ठिकाणी वर्दीचा अनादर केला, तरी संयम बाळगत महिलांचा आदर राखल्यामुळे त्या वाहतूक हवालदाराचा एसीपी लता धोंडे यांनी भररस्तात गाडी थांबवून सत्कार केला आहे.

वाहतूक हवालदार एकनाथ पार्टे यांचा कुलाबा विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त लता धोंडे यांनी भरचौकात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याबाबत बोलताना पार्टे यांनी सांगितले की, महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अपमान करण्यात आला, मात्र आपण संयम राखला. म्हणून त्याच रस्त्यावर येऊन मी आपला सन्मान करत असल्याचे धोंडे मॅडम यांनी सांगितले. व याप्रकरणी सखोल चौकशी करुन आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन धोंडे यांनी दिले आहे. दरम्यान, लता धोंडे या मरिन ड्राइव्ह विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यापूर्वी त्या वाहतूक विभागात कार्यरत होत्या.

काय आहे प्रकरण ?

२३ ऑक्टोबर रोजी काळबादेवी परिसरातील कॉटन एक्स्चेंज चौकात वाहतूक हवालदार एकनाथ पार्टे हे कर्तव्य बजावत होते. तेव्हा एक मोटार सायकल स्वार विना हेल्मेट सायकल चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांना विना हेल्मेटची कारवाई करण्यासाठी थांबविले. तेव्हा पुरुष सायकल स्वार व महिला यांनी पोलिसांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिलेने त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर कारवाई करुन त्यांच्यावर भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा नोंद केला.

पार्टे यांनी दाखविला संयम

महिलेने वाहतूक हवालदार पार्टे यांना अपशब्द वापरुन मारहाण केली. तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा संयम ढळू न देता कोनतीही अर्वाच्च भाषा न वापरता आरोपी महिलेला ‘मॅडम’ असे संबोधले. त्यांनी पुढील कारवाईसाठी साठी महिला पोलीस अंमलदारांना बोलवून घेतले. तसेच घटनेच्या ठिकाणी पार्टे यांनी आरोपी महिलेविरुद्ध कसलेही गैरवर्तन केल्याचे आढळून आले नाही.