दंड न घेता ऑन द स्टॉप DL बनविणार हैदराबाद पोलिस, हेल्मेट नसल्यास ते देखील देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने नवीन वाहतूक नियम कायदा कडक केल्यानंतर आता वाहतूक उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. त्याचदरम्यान हैदराबाद पोलिसांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पोलिसांनी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याऐवजी त्यांची मदत करण्याची योजना सुरु केली आहे. यामध्ये विना वाहन परवाना गाडी चालवताना पकडल्यास पोलीस थेट त्या वाहनचालकांचा परवान्यासाठी अर्ज करणार आहेत.

रचकोंडा पोलीस विभागाने हा स्तुत्य उपक्रम सुरु केला असून हेल्मेट नसणे, वाहन परवाना नसणे, पीयूसी नसणे तसेच वाहनाचा विमा नसणाऱ्या चालकांची  थेट यासाठी नोंद करून घेतली जाणार आहे. यामध्ये त्यांना कोणताही दंड आकारण्यात येणार नसून ऑनलाईन त्यांचा अर्ज करून त्यांना वाहन परवाना मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत. पोलीस उपायुक्त एन. दिव्यचरण राव यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, लोकांच्या मनात याविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून दंड वसूल न करता त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दरम्यान, नुकतेच केंद्र सरकारने नवीन वाहतूक कायदा आणला होता. यामध्ये विविध वाहतूक दंडाची रक्कम वाढवल्याने वाहनचालकांनी या दंडाची धास्ती घेतली आहे. तसेच अनेक वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल देखील करण्यात आला आहे. तसेच अनेक राज्यांनी या दंडाच्या रकमेत कपात देखील केली आहे.