वाहतूक पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भर चौकात दोघांचे भांडण सुरु असताना एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसून वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी कोंढवा वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी संजय जाधव आणि सहायक फौजदार चोपडेकर यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून त्याठिकाणी गेले. त्यांनी जखमी व्यक्तीला तातडीने रिक्षामधून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन त्याचे प्राण वाचवले. हा प्रकार रविवारी (दि.२५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एनआयबीएम चौकात घडला.

या घटनेत कोंढवा येथील जयेश बांगर हे जखमी झाले आहेत. तर हनुमंत पन्हाळकर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस नाईक संजय संपत जाधव (वय-५५) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी सायंकाळी संजय जाधव आणि त्यांचे सहकारी सहायक फौजदार चोपडेकर हे कोंढवा येथील एनआयबीएम चौकात वाहतूकीचे नियमन करत होते. त्यावेळी चौकामध्ये गर्दी दिसल्याने ते गर्दीच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जयेश बांगर आणि हनुमंत पन्हाळकर हे भांडण करत होते. भांडण सोडवत असताना पन्हाळकर याने बांगर यांच्या पोटात चाकु खुपसुन तसेच वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी संजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रिक्षामधून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, वार करणाऱ्या हनुमंत पन्हाळकर याला पकडण्याच प्रयत्न केला असता तो गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला.

कोंढवा वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे एकाचे प्राण वाचले. जखमी जयेश बांगर यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी हनुमंत पन्हाळकर याचा पोलिसांनी शोध घेऊन कोंढवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.