रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याचा रागातून मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक शाखेच्या पोलिस हवालदाराच्या कानशिलात लगावली. तसेच चालकाच्या भावाने सदर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. आज माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मयुर गायकवाड व मनीष गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मयुर गायकवाड हा रिक्षा चालक अाहे. आज सकाळी प्रवाशांची वाट पाहत त्याने माळीवाडा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्यात रिक्षा उभी केली. सदर रिक्षा रस्त्यातून बाजूला घ्या, असे तेथे वाहतूक नियमन करीत असलेले पोलीस हवालदार खरमाटे म्हणाले. तसेच रिक्षाची कागदपत्रे मागितली. त्यामुळे संतापलेल्या मयुर गायकवाड याने पोलीस हवालदार खरमाटे यांच्या कानशिलात मारली. तसेच रिक्षात बसलेला त्याचा भाऊ मनीष गायकवाड यानेही मारहाण केली.

सदर पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात मयुर गायकवाड, मनीष गायकवाड यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करीत आहेत.