पुणे शहरातील वाहतूक पुन्हा सुरू, ‘कंटेन्मेंट’ झोन क्षेत्र मात्र बंदच राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर आता ही वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ‘कंटेन्मेंट’ झोन मात्र बंदच ठेवण्यात आला असून, या भागात शक्यतो नागरिकांनी येऊ नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या भागांतील लावलेले बॅरिकेट्स व बांबू तसेच ठेवले आहेत, ते काही दिवस आणखी असतील असे वाहतूक विभागाने सांगितले आहे. इतर भागात सिग्नल व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

शहरात २३ मार्चपासून संचारबंदी लागू केली आणि वाहनांना देखील मनाई केली. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहने बंद केली होती. तरीही वाहने घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती. या काळात पोलिसांनी थकित दंडाची ६० लाखांहुन अधिक रक्कम देखील वसूल केली आहे. दरम्यान चौथा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात नियम शिथिल केले गेले. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील उपनगर तसेच मध्यभागात लक्ष्मी रस्ता, स्वारगेट, हडपसर, कोथरुड, पुणे स्टेशन, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क शिवाजीनगर, चतुःशृंगी, वारजे माळवाडीसह अनेक ठिकाणच्या रस्त्यावर वाहने आली आहेत. त्यामुळे आता या भागातील सिग्नल व्यवस्था सुरू केली आहे. तसेच वाहतूक पोलीस देखील रस्त्यावर उभा राहीले असून, नागरिकांनी सर्व नियम पाळावे तसेच सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

तरीही बॅरेकेट्स आणि बांबूचा अडथळा…
शहरात ‘कंटेन्मेंट’ झोन नसलेल्या परिसरात लावलेले बॅरिकेट्स व बांबूचा अडथळे अजून देखील आहेत. ते काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अडथळे दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोरोना ‘कंटेन्मेंट’ झोन नसलेल्या भागातील वाहतूक पुर्णतः सुरु करण्यात आली आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. तेथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी ‘कंटेन्मेंट’ झोन असलेल्या हद्दीतील प्रवास टाळून सहकार्य करावे. बहुतांश रस्त्यावरील वाहतूक सुरु झाल्यामुळे नागरिकांनी विरुद्ध दिशेने प्रवास करणे तसेच वाहतूकीचे नियम पाळावे.
अनिल पाटील (वरिष्ठ निरीक्षक, वाहतूक विभाग)