रूग्णापर्यंत पुण्यातील ‘ब्रेनडेड’ व्यक्तीचं ‘हृदय’ पोहविण्यासाठी थांबली दिल्लीची ‘ट्रॅफिक’, 21 मिनीटांमध्ये पुर्ण केलं 18 km अंतर ‘Delhi-Ncr’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्यातील ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय मंगळवारी विमानाने दिल्लीत आणले गेले. यावेळी एअरपोर्टपासून 18 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून हे हृदय हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आले. 47 वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय त्याच्या नातेवाईकांनी दान केले होते. या हृदयाचे प्रत्यारोपण 34 वर्षीय महिलेमध्ये करण्यात येणार आहे. दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया होणार आहे. पोलिसांनी सांगितले की, यासाठी 18 किलोमीटरचे अंतर 21 मिनिटात पार करण्यात आले.

ग्रीन कॉरिडोर तयार केला
हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे हृदय पुण्यात एका ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातून काढण्यात आले होते आणि नंतर विमानाने दिल्लीत आणण्यात आले. या प्रत्यारोपणासाठी अवयव दिल्ली विमानतळापासून फोर्टीस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता.

ट्रॅफिक पोलिसांची कार्यतत्परता यावेळी दिसून आली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ओखला येथील फोर्टीस रूग्णालयापर्यंत हृदय पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला. या दरम्यान 18 किलोमीटरचे अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले. यासाठी दिल्ली पोलिसांनी खुप तत्परता दाखवली. अशा प्रकारच्या कामात कोणत्याही प्रकारची अडचण येऊन उशीर होऊ नये याची काळजी घेण्यात आली. डॉक्टरांनीही दिल्ली पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक केले.

एसीपी (ट्रॅफिक) विनयपाल एस. तोमर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आम्ही मानवी हृदय विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत पोहचवण्यासाठी एक ग्रीन कॉरिडोर तयार केला होता, कारण या कामात प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. रूग्णवाहिकेला हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी लवकरात लवकर रस्ता मिळावा यासाठी बाहेरच्या रिंगरोडचा वापर करण्यात आला.

पोलिसांच्या सहकार्याची प्रशंसा
फोर्टीस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलचे डॉक्टर विशाल रस्तोगी यांनी हृदय वेळेत पोहचवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या मदतीची प्रशंसा केली. रस्तोगी म्हणाले की, यामुळे प्रत्यारोपणाची प्रक्रिया वेळेत पुढे सरकणार आहे. राष्ट्रीय संघटना आणि अवयव प्रत्यारोपण संघटना (NOTTO) सुद्धा देशात दान केलेल्या अवयवांचे योग्य नियंत्रण करण्याचे चांगले काम करत आहेत.