लोणंद – फलटण रेल्वेमार्गावर चार प्रवासी डब्यांसह वेगाची चाचणी

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – गेल्या काही वर्षांपासून लोणंद -फलटण मार्गावर रेल्वे केंव्हा धावणार याची जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर फलटणचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोणंद -फलटण रेल्वेमार्गावर रेल्वे धावण्यासाठी हालचाली सुरू करून सोमवारी (दि.१९) लोणंद ते फलटण मार्गावर रेल्वेच्या चार प्रवासी डब्यांसह वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेतली.

माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधून रेल्वे सुरू होण्यासाठी मोठा संघर्ष केला. लोकसभेत वारंवार आवाज उठवून रेल्वेमार्गाला मंजुरी मिळविली. त्यानंतरही काम पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच होता. त्यामुळे लोणंद ते फलटण रेल्वेमार्ग पूर्ण होऊन रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर वारंवार रेल्वे इंजिनच्या चाचण्या घेतल्या गेल्या.

लोणंद ते फलटण रेल्वेमार्गावर प्रवासी डब्यांसह चाचणी घेण्यासाठी सोमवारी (दि.१९) पुण्याहून रेल्वेची खास रेल्वेगाडी आली. लोणंद ते फलटण रेल्वेमार्गावर धावलेल्या या रेल्वेगाडीत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मार्गावर वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली. रेल्वे पाहण्यासाठी लोणंद ते फलटण मार्गावर जनतेने गर्दी केली होती.

दरम्यान, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झावर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लोणंद ते फलटण रेल्वे मार्गाची सेफ्टी आणि सिव्हिल विभागाकडून चाचणी झाल्यानंतर त्यांच्याकडून चाचणी रिपोर्ट चांगला आल्यानंतर प्रवासी रेल्वे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त-