‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट सापडला न्यायालयीन कचाट्यात 

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या संजय बारू यांनी लिहलेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या  पुस्तकाचा आधार घेऊन  बनवण्यात आलेला आणि अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाला आता न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. सुधीर ओझा यांनी मुजफ्फरनगर न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल केली असून डॉ. मनमोहन सिंग यांचा या चित्रपटात अपमान करण्यात आला आहे असे या याचिकेत म्हणले आहे.

याचिकाकर्त्यांनी या चित्रपटातील मुख्य अभिनेते अनुपम खेर, अक्षय खन्ना, निर्देशक विजय रत्नाकर गुट्टे यांच्या सह १४ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या खटल्याची सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार असून ११ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह, सोनिया गांधी, राहुल गांधी, सुषमा स्वराज, अटल बिहारी वाजपेयी, लालू प्रसाद यादव आणि मायावती या सर्व नेत्यांचा अपमान केला आहे. असा दावा याचिकाकर्ते सुधीर ओझा यांनी केला आहे.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच भाजप आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच भाजपने लगेच आपल्या ट्विटर हँडलवर या ट्रेलरचे रिट्विट केले. त्यावर काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी या चित्रपटाला भाजपची खेळी असल्याचे मानले. भाजपला काहीच दाखवण्या सारखे राहिले नाही म्हणून भाजप काँग्रेसची बदनामी करत आहे. परंतु भाजपने हे समजून घेतले पाहिजे कि आता तुमचे दिवस खूप थोडे राहिले आहेत असे पुनिया म्हणाले आहेत.पुनिया यांच्या वक्तव्यावर भाजपने अद्याप आपले मत व्यक्त केले नाही. भाजप आणि काँग्रेसच्या अशा युद्धाच्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी उपयोग होतो आहे.

११ जानेवारी २०१९ रोजी येऊ घातलेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचे निर्देशन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले असून त्यात मनमोहन सिंग यांची भूमिका जेष्ठ सिनेअभिनेते अनुपम खैर यांनी निभावली असून संजय बारू यांची भूमिका विनोद खन्ना यांनी निभावली आहे. २००४ ते २००८ पर्यंत संजय बारू हे मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम बघत होते. तर ते मनमोहन सिंग यांच्या संपर्कात पंतप्रधान पदावरून पाय उतार होई पर्यंत होते. संजय बारू यांनी ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच प्रकाशित केले होते. तेव्हा नरेंद्र मोदी आणि भाजपला या पुस्तकाच्या रूपाने  प्रचारासाठी आयते कोलीत हाती मिळाले होते.