प्रवासात आता बिनधास्त ‘झोपा’, स्टेशन येण्यापूर्वी रेल्वे देणार ‘वेकअप कॉल’

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  रेल्वे प्रवासात रात्री अपरात्री आपले स्टेशन येणार असेल, तर आपल्याला झोप येत नाही. झोप लागली आणि स्टेशन येऊन गेले तर अशी सतत भिती वाटत रहात असते. त्यामुळे निवांत झोप घेता येत नाही. पण आता रेल्वे प्रवासात आपण निवांत झोप घेऊ शकणार आहात. आपले स्टेशन येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर रेल्वे आपल्याला ‘वेकअप कॉल’ देणार आहे.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आयआरसीटीसी च्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली असून या सेवेच्या लाभ घेण्यासाठी प्रवाशांना १३९ वर फोन करुन आपला पीएनआर नंबर, स्टेशनचे नाव, स्टेशन का एसटीडी कोड अशी माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती दिल्यानंतर सिस्टम त्या रेल्वेगाडीची तत्कालीन स्थितीची माहिती घेऊन तुमचे स्टेशन येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ‘वेकअप कॉल’ देण्यात येणार आहे.

रेल्वेचा १३९ हा नंबर पूर्वी केवळ चौकशीसाठी होता. आता त्यात अनेक बदल केले आहेत. या नंबरवर आता रेल्वेमधील जागांची उपलब्धता, तिकीट रद्द करणे, रिफंड संबंधीचे नियम आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची स्थिती अशी माहितीही आपण जाणून घेऊ शकता.