रेल्वेच्या तिकीटांच्या ‘काळा’ बाजाराचं ‘टेरर फंडिंग’ कनेक्शन, दुबईपर्यंत गेलेत ‘तार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे तिकीटांचा काळाबाजार टेरर फंडिंगशी जोडलेला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या(RPF) तपासात असं आढळून आलं आहे की, या सगळ्याचा मास्टरमाईंड दुबईत आहे. हामिद अशरफ नावाच्या एका व्यक्तीला 2016 साली आरपीएफ रेल्वे तिकीटांचा काळा बाजार केल्याप्रकरणी अटक केली होती. उत्तर प्रदेशचा रहिवाशी असणाऱ्या या व्यक्तीवर 2019 मध्ये गोण्डा मध्ये बॉम्ब ब्लास्टचाही आरोप आहे. हामिद अशरफ जामीनावर सुटल्यानंतर नेपाळमार्गे दुबईत पळाला आहे. अशरफच्या अंडर भारतात जवळपास 20 हजार लोक ई-तिकीटांचा काळाबाजार करण्याचं काम करतात. त्यांना कदाचित याची कल्पना नसावी की त्यांची ही काळी कमाई आतंकवादाला प्रोत्साहन देण्यात लावली जात आहे.

हामिदच्या हाताखाली भारतात गुलाम मुस्तफा नावाचा माणूस काम करतो. आरपीएफनं 10 दिवसांपूर्वीच त्याला रेल्वे ईतिकीटच्या काळ्याबाजाराप्रकरणी ओडिसातून ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईलवरून जी माहिती मिळाली आहे की, त्यामुळे आरपीएफ सोबतच बंगळुरू पोलीसही हैराण झाले आहेत. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप एन्क्रीप्टटेड होता. सुरक्षा यंत्रणांनी तो क्रॅक केला आणि यातून जी माहिती मिळाली आहे ती टोळीचा हेतू कळण्यासाठी पुरेशी आहे.

या टोळीत गुरुजी नावाचा एक माणूस आहे. याचं खरं नाव काही तरी दुसरंच आहे. हा टोळीसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करतो जिथे तिकीट बुकींगच्या प्रक्रियेत 3 मिनिटे लागतात. गुरुजी असे प्रोग्रॅम तयार करत होता ज्यामुळे हे शक्य व्हायचं. या टायमिंगमुळे आरपीएफला काही तरी गडबड असल्याचा संशय आला. जेवहा या तिकीटांचा तपास केला तेव्हा मुस्तफाला अटक झाली. गुलाम मुस्तफा झारखंडच्या गिरीडीहचा रहिवासी आहे. त्याचं शिक्षण केंद्रपाराच्या मदरशात झालं. नंतर तो बंगळुरूला आला. 2015 साली तिथे त्यानं रेल्वे काऊंटर तिकीटाची दलाली सुरू केली. नंतर सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग घेतलं आणि ई-तिकीटंचा काळाबाजार सुरू केला. त्याच्या लॅपटॉपवरून असं दिसत आहे की, याचा संपर्क पाकिस्तानातील अनेक संघटनांशी असू शकतो. त्याच्या सोबत अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. त्यांच्या खाली 200-300 लोकांचं पॅनल आहे जे 28000 रुपये प्रतिमहिना काम करतं. हेच लोक देशातील 20000 तिकीट एजंट्ससोबत संपर्कात आहेत.

या काळ्याबाजारातून होणारी कमाई अनेकदा भारतातील एका सॉफ्टवेअर कंपनीत इन्वेस्ट करण्यात आली. या कंपनीवर आधीच सिंगापूरमध्ये एक खटला दाखल आहे, ज्याचा तपास सुरू आहे. ही टोळी परदेशातही पैसे पाठवत असते. अनेकदा या कंपनीनं बिटकॉईनसारख्या क्रीप्टोकरंसीनंही परदेशात पैसे पाठवले आहेत. या रकमेचा वापर टेरर फंडिंगसाठी होत असून या माहितीनं सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. मुस्तफा गेल्या 10 दिवसांपासून बंगळुरुमध्ये ज्युडीशियल कस्टडीत होता. आता त्याला पोलीस कस्टीत पाठवण्यात आलं आहे. अद्याप झालेल्या तपासातून आरपीएफचा अंदाज आहे की, प्रतिमहिना जवळपास 10-15 कोटी रुपयांची कमाई वेगवेगळ्या प्रकारे देशातून बाहेर पाठवली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –