तेलंगणामधील विकाराबादमध्ये ‘ट्रेनर’ विमान कोसळलं, 2 वैमानिकांचा मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था – खासगी विमान प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीचे एक विमान सरावादरम्यान कोसळल्याने दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला. तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात आज (रविवारी) ही दुर्घटना घडली. सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान येथील एका कपाशीच्या शेतात कोसळले. प्रकाश विशाल आणि अमनप्रीत कौर असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन शिकाऊ पायलटचे नाव आहे.

प्रकाश आणि अमनप्रीत हे दोघे हैदराबाद येथील राजीव गांधी एव्हिएशन अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी आहेत. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी रविवारी सकाळी बेगमपेट विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर तासाभरात विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. त्यानंत विमान कोसळल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. विकाराबाद पोलिसांनी अपघातग्रस्त विमानाचा शोध घेतला. पोलिसांनी कोसळलेल्या विमानाच्या अवशेषांतून दोन्ही पायलटचे मृतदेह बाहेर काढले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सुरुवातीला एकाच वैमानिकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. दुसऱ्या वैमानिकाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. सांयकाळच्या सुमारास दुसरा वैमानिकाचाही मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. दुर्घटनास्थळी कोणालाही जाण्यास सध्या बंदी घालण्यात आली असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

Visit : Policenama.com