बायोमेट्रिक प्रवेशामुळे आता रेल्वेत जागेसाठी होणार नाहीत भांडणे ; ‘या’ चार स्टेशनवर बसवली यंत्रणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुष्पक एक्सप्रेसनंतर आता रेल्वेतील अन्य डब्यात देखील जागांसाठी होणारी धक्काबुक्की आणि हाणामारी होणार नाही. यासाठी भारतीय रेल्वे लवकरच बायोमेट्रिक पद्धत सुरु करणार आहे. ‘पहिले या आणि पहिली जागा मिळावा’ या तत्वावर आता रेल्वेत जागा मिळणार आहे. यासाठी खास रेल्वे सुरक्षा बळाचा वापर केला जाणार आहे. मुंबईतील छत्रपति शिवाजी टर्मिनसवरून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग सफल झाल्यानंतर आता विविध रेल्वेमध्ये देखील हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

हि सुविधा लागू झाल्यानंतर प्रवाशांना फक्त बायोमेट्रिक मशिनद्वारेच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सामान्य प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेऊन आरपीएफच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हि योजना सुरु केली आहे. मुंबईतील चार स्टेशनवर यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आल्याची माहिती आरपीएफ अधिकारी अरुण कुमार यांनी दिली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि वाद टाळण्यास मदत होणार आहे असे देखील यावेळी अरुण कुमार यावेळी म्हणाले.

शिपाई आणि कुली विकत असतं जागा

दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठ्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मोठ्या प्रमाणात नागरिक अनारक्षित डब्यातून प्रवास करत असतात. जनरल डब्ब्यात चढण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात लढाई असते. रेल्वे यायच्या अगोदरच अनेक तास प्रवासी या स्थानकांवर गर्दी करत असतात. आरपीएफचे अनेक शिपाई आणि कुली अनेक वेळा या डब्यातील जागा जास्त पैसे घेऊन विकत असल्याचे देखील आरोप मोठ्या प्रमाणात होत असतात. त्याचबरोबर अनेक प्रवासी हे विना तिकीट देखील प्रवास करत असतात. त्यामुळे या पद्धतीमुळे प्रवाशांना देखील चाप बसणार आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांमुळेच आरपीएफचे अधिकारी अरुण कुमार यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हि पद्धत चालू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीला आवर घालणे शक्य झाल्याचे देखील अरुण कुमार यांनी सांगितले.