पिंपरी : नातीला अंघोळ घालताना इलेक्ट्रिक DP चा स्फोट, आजीसह चिमुकलीचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इलेक्ट्रिक डीपीचा स्फोट होऊन त्यातील ऑईल अंगावर उडाल्याने 4 महिन्यांच्या चिमुकलीसह आजीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चिमुकलीची आई गंभीर जखमी झाली आहे. शिवाज्ञा सचिन काकडे (वय-4 महिने) आणि शारदा दिलीप कोतवाल (वय-51) अशी मृतांची नावं आहेत. भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली.

या घटनेत शिवाज्ञाची आई अक्षता काकडे ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्या ऐंशी टक्के भाजल्या आहेत. भोसरी इंद्रायणी बैठी पत्र्यांची घरे आहेत. या घरांजवळच वीजवाहक रोहित्र आहे. शुक्रवारी या रोहित्रात बिघाड झाल्याने शनिवारी त्याजागी दुसरे रोहित्र बसवण्यात आले होते. मात्र, काही तासातच याचा भीषण स्फोट झाला आणि या रोहित्राने पेट घेतला. या भीषण स्फोटात आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शारदा कोतवाल या आपल्या नातीला दुपारच्या सुमारास आंघोळ घालत होत्या. त्यांच्या शेजारी चिमुकलीची आई अक्षदाही बसल्या होत्या. तेवढ्यात जवळच काही फुटांवर असलेल्या या रोहित्राचा भीषण स्फोट झाला आणि त्यातील उकळते तेल चिमुकलीसह दोघींच्या अंगावर पडले. यात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी पहाटे उपचारादरम्यान चार महिन्याची चिमुकली आणि आजीचा मृत्यू झाला. तर चिमुकलीच्या आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे.