सभागृहातून पारदर्शी व जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे : उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे. महानगरपालिकेने सुंदर सभागृह बांधले असून या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय व्हावेत आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. तसेच सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज या सभागृहातून व्हावे, असे मत उपराष्ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेच्‍या नवीन विस्‍तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमास  केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्‍याचे सामाजिक न्‍याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्‍यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मनपा आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

मि अनेक ठिकाणी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाही, असे गौरवोद्गार काढून उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू पुढे म्हणाले, या शहराविषयी नेहमीच मनात आदर व आकर्षण राहिले आहे. या शहराने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमुल्य योगदान दिले आहे. मुंबईनंतर देशात पुण्याची  ओळख आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या या पुणे शहराने केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे. नागरिकांना कालचे पुणे, आजचे पुणे आणि उद्याचे पुणे याबाबत समजावून सांगितल्यास त्यांचाही सहभाग याकामी होऊ शकतो. नागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करुन देतांनाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जावा. रस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीत, नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे महानगरपालिकेने सुंदर आणि देखणे सभागृह बांधले आहे. या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने अधिक महत्व वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार व आचार अंमलांत आणून या सभागृहातून कामकाज चालावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे.त्यांच्या कार्याने ही भूमी पुनित झालेली आहे.
सांस्कृतिक बरोबरच ज्ञाननगरी म्हणून पुण्याचा देशभर नावलौकिक आहे. 21  व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पुणे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर व्हावे, यासाठी विविध विकासाची कामे आपण या शहरात राबवित आहोत. यामध्ये पुणे महामेट्रो, रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहे. पुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.  तसेच पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नद्यांचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे उद्घाटन झाले होते. त्यांच्या स्वप्नातले हे शहर आदर्श, सुंदर व देखणे होण्यासाठी राज्यशासनाचे पाठबळ असणार आहे.
पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यापुढेही अधिक जोमाने सुरु राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करुन  मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे. या सभागृहातून चांगले निर्णय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.