व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे ऑक्सिजन टँकर्स पळवण्याचा डाव उधळला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक जवळपास 60 हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. अशात ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल सुरु आहेत. अशा परिस्थितीत नागपुरात येत असलेले ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र एका व्यवसायिकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला आहे. गुजरातमधून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला अधिकची रक्कम मिळाल्याने त्याने 4 ही टँकर्स परस्पर अहमदाबादला पाठवत असल्याचे समोर आले आहे.

अशमी ट्रान्सपोर्टचे संचालक प्यारे खान यांनी नागपूरला ऑक्सिजनची गरज असल्याने सीएसआरच्या माध्यमातून 4 टँकर्सची व्यवस्था केली होती. ऑक्सिजन घेऊन हे टँकर छत्तीसगडच्या भिलाईहून निघाले होते. मात्र त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा विलंब झाला. त्यामुळे खान यांनी ऑक्सिजन टँकर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने उशिर होत असल्याचे सांगितले गेले.

टँकर्स येण्यास बराच उशीर होत असल्याने खान यांनी तातडीने त्यांची एक टीम टँकर अडकून पडलेल्या ठिकाणी पाठवली. त्यावेळी धक्कादायक बाब त्यांच्या समोर आली. 4 ही टँकर्स अहमदाबादच्या दिशेने निघाले होते. याबाबत खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र त्यांनी उत्तर देणेच बंद केले. त्यामुळे खान यांनी सूत्र हलवली आणि 4 टँकर्स रोखण्याचा निर्णय घेतला. 4 पैकी 2 टँकर्स औरंगाबादजवळ पोहोचले होते. तर इतर दोन टँकरही त्याच दिशेने निघाले होते. मात्र खान यांनी चारही टँकर्स वळवायला लावले. यापैकी 2 टँकर्स नागपुरात पोहचले असून उर्वरित 2 टँकर्स थोड्याच वेळात नागपुरात दाखल होणार आहेत.