खळबळजनक ! चक्क रुग्णवाहिकेतून देशी दारुची वाहतूक, संगमनेरमधील प्रकार

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. यातून अत्यावशक सेवांना वगळण्यात आले आहे. याचाच गैरफायदा घेत चक्क रुग्णवाहिकेतून देशी दारूचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दारुची वाहतूक करणा-या रुग्णवाहिका चालकासह दोघांना शुक्रवारी (दि. 23) अटक केली आहे.

संगमनेर बसस्थानकासमोर नाकाबंदी केली आहे. सकाळी 11 च्या सुमारास वाहनांची तपासणी करताना तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी थांबण्याचा इशारा केला. रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारु आढळून आले. या प्रकरणी रुग्णवाहिका व त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.