वाहतूक आणि पाणी प्रश्नाची सोडवणूक अंदाजपत्रकाच्या केंद्रस्थानी ; नगररोडला झुकते माप

पुणे, दि. २२(प्रतिनिधी) – मेेट्रो प्रकल्प, पीएमपीएमएल चे सक्षमीकरण,वाहन तळांच्या विकासासोबत शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या उच्चतम क्षमता द्रुतगती मार्गाच्या ( एचसिएमटीआर) कामाची सुरुवात करणे. तसेच नगररोडला वरदान ठरणाऱ्या भामाआसखेड पाणी पुरवठा योजनेसोबत नगररोडच्या वाहतूक सुधारणेसाठी भरीव तरतूद असलेले ६ हजार ७६५ कोटी रुपयांचे २०१९-२० या वर्षीचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आज सर्वसाधारण सभेत सादर केले. शहरात यापूर्वीच मोठ्या प्रकल्पांची सुरुवात झाली असून ती वेगाने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच शहरातील सर्व घटकांना चांगल्या पायाभूत उपलब्ध करून देण्यावर अंदाजपत्रकात भर देण्यात आल्याचा दावा मुळीक यांनी यावेळी केला.

पुणे महापालिका स्थायी समिती सन २०१९-२० चे अंदाजपत्रक पाहा पोलीसनामा Facebook Live…

महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिदार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते याप्रसंगी उपस्थित होते. माझं पुणे स्मार्ट पुणे ही संकल्पना पुणेकरांनी स्वीकारली आहे. शहराच्या गरजा आणि प्रश्न लक्षात घेऊन भविष्यातील आदर्श शहर घडविण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार केले आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचे काम हाती घेतले आहे. कामाची गती पाहता येत्या काही महिन्यांमध्ये शहरात मेट्रो धावू लागेल. शहरात १९५ किमीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. त्यानुसार पुढील टप्प्यातील मार्गांचा डीपीआर तयार करण्याचे काम आगामी वर्षात हाती घेण्यात येईल.

मेट्रो सोबतच शहरांतर्गत वाहतुकीसाठी ३६ किमीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यात या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यासाठी अंदाज पत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी उड्डाणपुलासाठी ३० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठीही निधी उपलबद्ध करून दिला आहे. शिवणे खराडी आणि बालभारती पौड रस्त्याच्या कामासाठीही चांगली तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या रोड सेफटी ऑडिट मधील सूचनांचे गांभीर्य ओळखून नगर रस्त्यावरील गोल्फ चौक,खराडी येथे उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर, कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, येरवडा शास्त्रीनगर येथे उड्डाण पुल आणि विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पुल अशी ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी शहराच्या विविध भागात ६ बहुमजली वाहनतळ उभारण्यात येतील. पीएमपीएमलच्या सक्षमीकरणासाठी १३०० ई बसेस आणि ८०० सिएनजीवर धावणाऱ्या बसेसची घेण्याची प्रक्रिया यावर्षी सुरू केली असून पुढील आर्थिक वर्षात १५० बसेस खरेदीसाठी सुमारे १८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

जल प्रदूषण रोखणे, नदीकाठ सुधार करण्यासोबत आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन रस्त्यांचा विकास, उद्यानांची निर्मिती, शिवसृष्टी, गदिमा स्मारक, वारकरी सांस्कृतिक भवन, हज हाऊस, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक, शहिद सौरभ फराटे स्मारक, महिलांसाठी स्वयंरोजगार, युवकांसाठी स्वयंरोजगार, संस्कार केंद्र, महिलांसाठी वसतीगृह, अग्निशामक केंद्र आणि समाविष्ट ११ गावांसाठी पुरेशी तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

भामा आसखेड योजना ऑक्टोबर पर्यंत कार्यन्वित करणार

नगररोड परिसराचा पाण्याच्या प्रश्न ओढविण्यासाठी भामा आसखेड योजनेचे काम हाती घेतले आहे. परंतु धरणग्रस्तांच्या पुनर्वसन आणि नुकसान भरपाईच्या कारणास्तव हे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. धरणग्रस्तांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अंदाजपत्रकात १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे काम लवकरच सुरू होईल आणि प्रकल्प ऑक्टोबर पर्यंत कार्यन्वित होईल. हा प्रकल्प पूर्ण करत असतानाच चोवीसतास पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही गती देण्यात येईल. त्यामुळे येत्या वर्षभरात नगररोडचा पाणी प्रश्न मिटेल त्याचवेळी शहराच्या इतर भागासाठी जास्तीचे पाणी उपलबद्ध होईल, असा दावा योगेश मुळीक यांनी केला.

६८० कोटी रुपयांनी फुगविलेले अंदाजपत्रक

स्थायी समितीने आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकापेक्षा ६८० कोटी रुपयांनी अंदाजपत्रक फुगविले आहे. प्रत्यक्षात २०१८-१९ मध्ये पालिकेला ४,४०० कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याने चालू वर्षी सुमारे १,५०० कोटी रुपये तूट येणार आहे. नैसर्गिक वाढ १० टक्के वाढ धरल्यास पुढील वर्षी ४,९०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे स्थायी समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकानुसार पूढील आर्थिक वर्षात सुमारे १,८०० कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. जाहिरात धोरण, वाढविलेले केबल खोदाई चार्जेस, मिळकतकर आणि पाणीपट्टीच्या थकबाकीतून उत्पन्न वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. प्रसंगी मोठ्या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज अथवा बॉण्ड्स घेण्यात येतील,असा दावा योगेश मुळीक यांनी या वाढीव अंदाजपत्रकाबाबत केला आहे.

pmc

अंदाज पत्रकातील ठळक मुद्दे

*महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी अंदाजपत्रकात 192 कोटी रुपयांची तरतूद केली आहे रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतागृह मैलापाणी शुद्धीकरण सार्वजनिक प्रकाश व्यवस्था आदी कामांसाठी ही तरतूद केली आहे.

*रामवाडी ते लोहगाव विमानतळ आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद*गोल्फ चौक येथे उड्डाणपुल किंवा ग्रेड सेपरेटर उभा करण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद

*खराडी येथे उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर करण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद

*कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क पुलाचे विस्तारीकरणाकरिता 15 कोटी रुपयांची तरतूद

*येरवडा शास्त्रीनगर येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद

*सिंहगड रस्त्यावर राजाराम चौक ते फन टाईम थिएटरत या भागात दोन किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल उभारण्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद

*धायरी फाटा येथे जंक्शन पुल आणि पाषाण – सुस उड्डाणपूल उभारण्यासाठी तरतुद

*जंगली महाराज रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनी ,मेकडोनाल्डच्या शेजारी ,दत्तवाडी ,बाणेर ,वारजे, विमान नगर, कोंढवा बुद्रुक आदी भागातील सार्वजनिक वापराच्या जागांवर वाहनतळाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी 29 कोटी रुपयांची तरतूद

*उच्चतम क्षमता द्रुतगतीमार्ग एच सी एम टी आर या प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

*कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी 55 कोटी 30 लाख रुपये ची तरतूद

*शिवणे ते खराडी नदीपात्रातील रस्त्यासाठी 22 कोटी 12 लाख रुपयांची तरतूद

*कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बालभारती ते पौडफाटा या रस्त्याचा वाहतूक आराखडा आणि पर्यावरण आघात मुल्यांकनासाठि 28 लाख रुपयांची तरतूद

*ई बसेस ,सीएनजी बसेस खरेदीसाठी एकूण 180 कोटी रुपयांची तरतूद

*पीएमपी प्रवासासाठी दृष्टीहीनांना मोफत पास दिला जातो .यावर्षीपासून दृष्टिहीनांसोबत असलेल्या मदतनीसाला रेल्वे आणि एसटी प्रमाणेच पीएमपीच्या प्रवास तिकिटात 50% सवलत दिली जाणार आहे. दृष्टिहीन पास धारकांची संख्या दीड हजार इतकी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अंदाजपत्रकात यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद

* मुळा मुठा शुद्धीकरण ,नदी काठ सुधारणा, नैसर्गिक जलस्त्रोतांचा विकास ,कात्रज तलाव प्रदूषण मुक्त, वाहिन्यांमधील गाळ काढणे याकरिता एकूण 96 कोटी रुपयांची तरतूद

*डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद

*महापालिकेच्या सर्व 19 प्रसूतिगृहांमध्ये स्मार्ट स्कोप हे कर्करोगाचे निदान करणारे उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध केली जाणार आहे. याकरिता एक कोटी रुपयांची तरतूद, सुरळीत औषध पुरवठा साठी सॉफ्टवेअर तयार केले जाणार आहे, राजीव गांधी रुग्णालयात डायग्नोसिस सेंटर उभे करण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद, महापालिकेच्या प्रत्येक विभागात पुष्पक शववाहिनी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

*प्रकाश गोळे पक्षी संवर्धन योजना राबवून त्यांतर्गत पक्षी संवर्धन संमेलनाचे आयोजन केले जाणार.

*प्लास्टिक कचऱ्याचे संकलन वापर पुनर्वापर आणि त्याची विल्हेवाट लावणे आदी वर संशोधन करण्यासाठी ई कचरा व प्लास्टिक संशोधन केंद्र सुरू केले जाणार त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतुद

*शहरात मोकळ्या जागा ,ऐमेनिटि स्पेस ,बीडीपी क्षेत्र, उद्याने ,मैला पाणी शुद्धीकरण केंद्र आदी ठिकाणी पन्नास एकर जागेवर बांबू विकास महामंडळ यांच्याशी करार करून प्रायोगिक तत्त्वावर ‘कल्पवृक्ष कार्बन न्यूट्यल’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

*शहर परिसरातील टेकड्या आणि वनजमिनी याठिकाणी शहरी जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी साठी दोन कोटी रुपयांची तरतूद

*टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे

*वानवडी वडगाव शेरी येथील महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालय सुरू केली जाणार आहे .महापालिका शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन ,महापालिका शाळांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा उपक्रम राबवून मुलांना पुस्तके देणे, महापालिकेच्या शाळेतील 23 मैदाने क्रीडांगण म्हणून विकसित केली जाणार, महापालिका शाळा आणि उद्यान येथे योग केंद्र सुरू केले जाणार आहे, सणस मैदान येथे शशिकांत भागवत क्रीडा संग्रहालय व माहिती केंद्राची उभारणी ,कल्याणी नगर येथे क्रीडा अकादमी सुरू केली जाणार आहे .

*शिव सृष्टी करता भूसंपादनासाठी 26 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद ,गीत रामायणकार ग .दि .माडगूळकर यांच्या स्मारकासाठी 50 लाख रुपयांची तरतूद ,आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारकासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास करण्यासाठी 11 कोटी 40 लाख रुपयांची तरतुद

*हडपसर येथे वारकरी सांस्कृतीक भवनाकरीता दोन कोटी 17 लाख रुपये , हज हाऊस करीता एक कोटी 17 लाख रुपयांची तरतूद

*महिलांसाठी राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना सुरू केली जाणार आहे. स्वसंरक्षण, स्वावलंबन, समुपदेशन या तीन बाबींवर योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात अडीच कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मागासवर्गिय समाजातील महिलांना स्वयंरोजगार उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी संगोपन केंद्र सुरू केले जाणार आहे.

नगर रस्त्याला झुकते माप

*पुणे-नगर रस्त्यावरील कळस ,संगमवाडी, येरवडा, लोहगाव ,धानोरी, कल्याणी नगर ,वडगाव शेरी ,विमान नगर ,खराडी ,चंदन नगर आदी भागाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी भामा-आसखेड ही योजनेतून पाणी मिळणे गरजेचे आहे .योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात 185 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद प्रकल्पग्रस्तांना जागेचा मोबदला म्हणून दिली जाणार आहे.

nagar road

*नगर रस्त्यावरील मेट्रोच्या मार्गासाठी मार्गाचा स्वतंत्र प्रकल्प अहवाल करण्यासाठी अंदाजपत्रकात आठ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी काही रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले. यामध्ये पुणे नगर रस्ता वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्या अनुषंगाने या रस्त्याचा एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे .यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गाचे सक्षमीकरण, पुरेशी बससंख्या ,ठिकाणी उड्डाणपूल -ग्रेड सेपरेटर ,भुयारी मार्ग आणि ऑडिटमध्ये सुचवलेल्या उपाययोजनांची कारवाई केली जाणार आहे. विमान नगर येथे वाहनतळाची निर्मिती केली जाणार आहे, शिवणे ते खराडी नदीपात्रातील रस्ता देखील नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करू शकतो .त्या दृष्टीने देखील अंदाजपत्रकात तरतूद केली गेली आहे. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डायगणोसिस सेंटर उभे करण्यासाठी तरतूद ,विश्रांतवाडी किंवा मुंढवा येथे प्राणी उपचार व संगोपन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव, वडगाव शेरी येथे दिव्यांगासाठी अडथळा विरहित आणि वैशिष्ट्यपूर्ण पाम उद्यान, धानोरी येथे शहरी जलयुक्त शिवार योजना ,लोहगाव येथील कचऱ्याचे वर्गीकरण केंद्रात यांत्रिक पद्धतीने काम करण्यासाठी तरतूद,विमाननगर येथे क्रीडा अकादमीची उभारणी, वडगाव शेरी येथील ई लर्निंग स्कूल साठी स्वतंत्र ईमारत बांधली जाणार आहे ,कळस धानोरी परिसरात विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे ,वडगाव शेरी येथे नवीन लाईट हाऊस प्रकल्प राबविला जाणार आहे, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचा विकास अशा विविध तरतुदी नगर रस्ता भागासाठी केल्या आहेत.