उद्या व्यापार ठप्प ! व्यापारी संघटना ‘कॅट’कडून ‘भारत बंद’चं आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन : ‘भारत बंद’ला देशभरातील बाजार बंद राहणार आहेत. तसंच कोणत्याही प्रकारचे व्यापार ठप्प राहणार आहेत. देशातील सर्व राज्यांतील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी ‘व्यापार बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, असा दावा ‘कॅट’कडून करण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’कडून जीएसटीच्या नियमांच्या समिक्षेची मागणी करत उद्या म्हणजेच शुक्रवारी ‘भारत बंद’चं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच व्यापाऱ्यांकडून ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी करण्यात आली आहे .

‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी आपलं म्हणणं मांडण्यासाठी दिल्लीतसहीत देशभरातील जवळपास दीड हजार ठिकाणी धरणं आंदोलन आयोजित करण्यात आलंय. तसंच या दिवशी व्यापाऱ्यांकडून ‘जीएसटी पोर्टल’वर लॉग इन न करता आपला विरोध दर्शवण्याची योजना आखण्यात आली आहे. देशभरात व्यापाऱ्यांचा हा विरोध तर्कसंगत आणि शांतीपूर्ण पद्धतीने पार पडेल. होलसेल आणि रिटेल बाजारही पूर्णत: बंद राहतील. परंतु, अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकानं मात्र या बंदमधून वगळण्यात येतील, असंही ‘कॅट’कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

गेल्या चार वर्षांत जीएसटी नियमांत आत्तापर्यंत जवळपास ९५० बदल करण्यात आले आहेत. जीएसटी पोर्टलवर अनेकदा तांत्रिक बिघाड आणि नियम पाळण्याचं ‘ओझं’… हे या व्यवस्थेच्या प्रमुख त्रुटी आहेत. जीएसटी प्रणाली सरळ आणि सुसंगत करतानाच एखादा सामान्य व्यापारीही सहजगत्या जीएसटी तरतुदी पाळू शकेल, अशी त्याची योजना असावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, व्यापार बंद करणं हे काही व्यापाऱ्यांचं ‘कर्म’ नाही परंतु तरीही आम्हाला हे करावं लागतंय. याचं कारण म्हणजे सरकारनं लागू केलेली जीएसटी प्रणाली सहज आणि सोपी होण्याऐवजी आणखीन कठीण होऊन बसली आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मूळ उद्देशापासून जीएसटी प्रणाली खूप दूर गेलीय आणि ही प्रणाली समजून घेताना व्यापारी हैराण झाले आहेत. सरकारकडून या प्रणालीद्वारे व्यापाऱ्यांवर अधिक ओझं टाकण्यात आलं. जीएसटी काउन्सिल ज्या दिशेनं काम करत आहे, ती लोकशाहीविरुद्ध आहे, असंही कॅटनं म्हटलंय. इंधन भाववाढीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅट’च्या भारत बंदला ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन’ (AITWA) कडूनही समर्थन मिळालंय. २६ फेब्रुवारी रोजी ‘चक्का जाम’ करण्याची योजनाही आखण्यात आलीय. ‘कॅट’सोबत देशभरातील जवळपास ४० हजारांहून अधिक व्यापारी ‘भारत बंद’चं समर्थन करत आहेत.