आता 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणं महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने (NHAI) प्रत्येक नवीन आर्थिक वर्षात टोल दरात वाढ केली जाते. त्यानुसार यंदा टोल टॅक्समध्ये जवळपास 5 टक्के वाढी शक्यता आहे. तसेच जे वाहनचालक टोल प्लाजासाठी मासिक पास बनवतात त्यात देखील 10 ते 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणे महागणार आहे. तसेच या वाढीचा थेट परिणाम ट्रान्सपोर्टेशनवरही होणार असून यामुळे भाज्या, फळ आणि दुध आदी महागण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोरखपूरमधील तीन टोल प्लाजावर 5 ते 30 रुपयांची वाढ होईल. तसेच मासिक टोलवरही 10 ते 20 रुपये वाढ होईल. NHAI गोरखपूर झोनचे प्रोजेक्ट डायरेक्टर द्वीवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल टॅक्स दरवर्षी आर्थिक वर्षात वाढवला जातो. नवीन दराची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होईल. त्यासाठी मुख्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. FASTag इलेक्ट्रिक टोल कलेक्शन सिस्टममुळे टोल प्लाजावर वेटिंग टाईम कमी करण्याचा दावा केला आहे. तसेच त्यामुळे इंधनाचा वापरही कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व वाहनांनी FASTag चा वापर करुन नॅशनल हायवेवर प्रवास केल्यास, भारत दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलवर 20000 कोटी रुपयांची बचत करेल असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.