Lockdown : वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पुणे ते आसाम प्रवास, उच्च न्यायालयानं दिली परवानगी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यभरात संचारबंदी आहे. असे असताना आसाममध्ये वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी उच्च न्यायालयाने तरुणाचा पेच सोडविला आहे. आसाममध्ये जाऊन वडिलांवर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून न्यायालयाने त्याला पुणे ते आसाम रस्तेप्रवास करण्यास परवानगी दिली आहे. या प्रवासादरम्यान त्याची कुठेही अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच न्यायालयाने अशा प्रकारची परवानगी दिली आहे.

बिनी ढोलानी असे पुणेस्थित याचिकाकर्त्यांचे नाव आहे. त्यांनी वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी पुण्याहून आसाम येथील लंका येथे रस्तेप्रवास करण्यास परवानगी उच्च न्यायलयाकडे मागितली होती. ढोलानी यांच्या वडिलांचे 5 एप्रिलला लंका येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी कार्गो विमान वा जी विमानसेवा उपलब्ध असेल त्याने जाण्यास तयार आहोत. परंतु टाळेबंदीमुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीवर बंदी असल्याने आसाम येथे पोहोचण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली होती.

परंतु आतापर्यंत कुणालाही विमानाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, अशी भूमिका केंद्र सरकारतर्फे न्यायालयासमोर मांडण्यात आली. असे असले तरी ढोलानी यांना पुणे ते आसाम असा रस्तेप्रवास करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असेही केंद्र सरकारतर्फे स्पष्ट केले. त्यासाठी पुणे जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक ते आदेश देण्यात येतील, तसेच याचिकाकर्त्यांच्या रस्तेप्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, असेही केंद्र सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी घेणार्‍या न्यायमूर्ती अनिल मेमन यांनी केंद्र सरकारचे म्हणणे मान्य केले. तसेच ढोलानी यांनी परवानगीसाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले.

You might also like