‘कोरोना’बाधित रूग्णांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणतात…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी, सरकारी रुग्णालय आणि प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना संसर्गित आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, याकरिता सर्व डॉक्टरांनी खबरदारी घेण्यात यावी. तसेच वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांमध्ये अधिक विश्वास निर्माण करावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्गाचा प्रसार लक्षात घेता, खासगी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना संसर्गित आणि इतर आजारांच्या रुग्णांवर वेळेत उपचार करुन त्यांना मानसिक आधार द्यावा. वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. ज्या खासगी रुग्णालयांत कोविड-१९ तपासणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे, त्या ठिकाणी कोविडच्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आदेश देण्यात यावे. प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-१९ चे नमुने तपासणीसाठी येत आहेत. त्या नमुना तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त करुन द्यावेत. सर्वानी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे. आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याकरिता प्रशासन सहकार्य करेल, असे राम यांनी सांगितले.

तसेच सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वय राखून कामे करावीत. काही अडीअडचणींबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनास माहिती सादर करण्यात यावी, असे साखर आयुक्त सौरभ राव यांनी म्हटलं. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, रुग्णालय आणि प्रयोगशाळांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.