धक्कादायक ! मास्क न वापरताच Covid रुग्णांवर केला उपचार; डॉ.उमाशंकर गुप्तावर FIR

वांगणी (बदलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्या कोरोना लाटेने लोकांचं जीवनमान बिकट करून टाकलं आहे. दैनंदिन बाधितांची संख्या अधिक वाढत असल्याने अनेक आरोग्य यंत्रणा आणि डॉक्टर लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच वांगणी येथील एक डॉक्टर मास्क न वापरता कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. डॉ.उमाशंकर गुप्ता असे त्या डॉक्टरांचे नाव आहे. या प्रकारावरून डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई जवळील बदलापूर येथील वांगणीमध्ये शिला क्लिनिक नावाने दवाखाना आहे. तर एक गंभीर आणि धक्कादायक बाब म्हणजे डॉ. गुप्ता स्वत: मास्क वापरत नाही आणि अन्य रुग्णांना देखील मास्क न वापरण्यास सांगतात. असा गुप्ता यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकारावरून स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तेथील बदलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून डॉ. गुप्ता आणि त्याची सहकारी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

या दरम्यान, डॉ. गुप्ता याने कोरोनाबाधित रुग्ण आपण बरे केले असल्याचा दावा केला आहे. प्राणवायू पातळी कमी झालेल्या रुग्णांना देखील आपण काही तासांत बरे केल्याचा दावाही डॉ. गुप्ता यांनी केला असून रुग्णांकडून तसे बोलवून सुद्धा घेतले आहे. असे काही व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. तर, कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची या डॉक्टराकडे कोणतीही परवानगी नव्हती. तर कोरोना विषाणूचा संक्रमण पसरवण्यासाठी आणि नियमाला पायदळी तुडवल्याने डॉ. गुप्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता हे अजून अटकेत नसून त्याचा अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.